माणगाव ः प्रतिनिधी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जारी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे लहान मुलांना खेळता, बागडता येत नाही. त्यामुळे ही मुले घरीच आपल्या परिवारासोबत वेळ घालवताना दिसत आहेत. अशातच अगस्त्या इंटरनॅशनल फाऊंडेशन संस्थेद्वारे सुरू करण्यात आलेल्या ऑनलाइन समर कॅम्प उपक्रमात आता अशा मुलांचा वेळ सार्थकी लागणार आहे. कारण या माध्यमातून इनोव्हेशन कार्णीवल हा उपक्रम नव्यानेच सुरू झाला असून यामध्ये अनेक संकल्पना मुलांना साकारायला मिळत आहेत.
एकूण 10 दिवसांच्या नियोजनामध्ये मुलांना वेगवेगळ्या कृती करायला दिल्या जातात. त्यामध्ये मुलेही ती कृती करून या संस्थेद्वारे तयार करण्यात आलेल्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर शेअर करतात. यामध्ये मुलांची आकलनशक्ती अधिक तेजोमय पद्धतीने काम करीत असून त्यांच्यात असलेली जिज्ञासू वृत्ती यामध्ये घेण्यात येणार्या कृतीतून दिसते. राज्यात अनेक विभागात इनोव्हेशन कार्णीवलची क्रेझ असून यातून मुलांनाही त्यांची कलाकौशल्ये बाहेर काढण्यात मदत होते. डिझाइन प्रोसेस व नवनवीन आयडियांच्या संकल्पनेवर आधारित समर
कॅम्पमधून पालकांचाही उत्साह वाढला आहे. कोरोनावर उपाय सांगणारे विषयही मुले कॅम्पमधून साकारत आहेत. पाचवी ते इंजिनियर मुलांपर्यंत ही कार्णीवल उपक्रमाची संकल्पना सर्वांना नव्या ध्येयापर्यंत घेऊन जात आहे. या मुलांना गणेश, ज्योती, राजरतन, विशाल अशी टीम गाइड करीत आहे.
इनोव्हेशन कार्णीवल एक जबरदस्त संकल्पना असून मुले स्वतः आजूबाजूच्या परिसरातील, घरातील कोणताही प्रॉब्लेम शोधून त्यावर इनोव्हेटिव्ह मॉडेल डिझाइन करीत आहेत. त्यामुळे त्यांच्या जुगाड पद्धतीला या उपक्रमातून चालना मिळत आहे. मुले समर कॅम्पमध्ये अगदी मनमोकळेपणाने एन्जॉय करताना दिसतात. विद्यार्थ्यांचा वेळ या ठिकाणी नक्कीच सार्थकी लागताना दिसत आहे.
-श्रवनकुमार, इनोव्हेशन कार्णीवल लीड