ना. रामदास आठवले यांचे आगामी मुंबई महापालिका निवडणुकीबाबत विधान
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीबाबत मोठे विधान केले आहे. आरपीआयला बीएमसी निवडणुकीत 35 ते 36 जागा मिळाल्या पाहिजेत, अशी मागणी रामदास आठवले यांनी केली. तसेच यापैकी आरपीआयच्या 18 ते 20 जागा निवडून येतील, असा दावाही आठवले यांनी केला. यावेळी रामदास आठवले यांनी शिवसेनेला सत्तेतून बाहेर काढणे अत्यंत आवश्यक असल्याचंही मत व्यक्त केले. ते सोमवारी (दि. 6) नवी मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.
रामदास आठवले म्हणाले, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत आरपीआयला 35 ते 36 जागा मिळाल्या पाहिजे. आमचा यापैकी 18 ते 20 जागा निवडून आणायचा प्रयत्न असेल. मुंबई महानगरपालिका शिवसेनेकडून हिसकावून घेण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. शिवसेनेचे मुंबईच्या विकासाकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. प्रत्येकवेळी पावसाळ्यात मुंबई तुंबते, मुंबईची तुंबई करण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून झाला आहे. म्हणून शिवसेनेला सत्तेतून बाहेर काढणे अत्यंत आवश्यक आहे.
यशवंत जाधव यांना 4 वेळा स्थायी समिती सभापद दिले. मात्र, बौद्ध असल्यामुळे महापौर पदाची संधी दिली नाही. यशवंत जाधव यांच्या पत्नी आमदार आहेत. मात्र, तरीही त्यांना मंत्रिमंडळात स्थान दिले नाही. बौद्ध समाजाला डावलण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून वारंवार झाला आहे. सध्या यशवंत जाधव यांची चौकशी सुरू आहे. त्यांनी त्यांची बाजू
मांडली, मात्र शिवसेना यशवंत जाधवांची बाजू घ्यायला तयार नाही, असा आरोप रामदास आठवले यांनी केला.
अनिल परब यांना पाठिंबा दिला जातो, पण यशवंत जाधव यांना पाठिंबा दिला जात नाही. शिवसेनेची भूमिका बौद्ध समाजावर अन्याय करण्याची आहे. शिवशक्ती भीमशक्तीचा बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रयोगाला शिवसेनेने मूठमाती देण्याचे काम केले आहे, अशी टीकाही आठवलेंनी केली.
देवेंद्र फडणवीस यांचे आभार
राज्यसभा निवडणुकीवर बोलताना रामदास आठवले म्हणाले, राज्यसभेची सहावी जागा भाजपची निवडून आली पाहिजे. आमच्याकडे 32 मते आहेत. आम्हाला केवळ 10 मतांची आवश्यकता आहे. त्यामुळे सहावी जागा निवडून आणण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. महाविकास आघाडीचा प्रस्ताव फेटाळल्याने देवेंद्र फडणवीस यांचे मी आभार मानतो.