Breaking News

लॉकडाऊनमध्ये कर्जतच्या तरुणांनी शोधला रोजगार; फुलवला भाजीचा मळा

कर्जत, : बातमीदार – लॉकडाऊनमुळे सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. त्यामुळे घरात बसून काय करायचे, हा प्रश्न सर्वांना भेडसावत आहे. अशा वेळी नेरळजवळील तळवडे गावातील चार तरुणांनी एकत्र येत समूह शेती केली आहे. या मळ्यामधून उत्पन्न मिळू लागले आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात 23 मार्चपासून लॉकडाऊन सुरू आहे. हा लॉकडाऊन महिन्यात थांबेल असा कयास बांधला जात होता. कर्जत तालुक्यातील तळवडे गावातील चार शेतकरी तरुणांनी लॉकडाऊन काही महिने राहणार हे हेरून स्वतःला आपल्या शेतात रमवून घेतले. महेश शेळके, संदीप मसणे, गणेश मसणे, दयेश शेळके या तरुणांनी आपल्या कुटुंबातील सर्वांना एकत्र घेत उल्हास नदीमधील बारमाही वाहत्या पाण्याचा उपयोग करून घेतला आणि भाजीपाल्याचा मळा फुलवला. हे सर्व शेतकरी असलेले तरुण पावसाळ्यात भाताची शेती करण्याव्यतिरिक्त कोणत्याही प्रकारची शेती करीत नव्हते. त्यामुळे भाजीपाला शेती त्यांच्यासाठी तशी नवीनच होती, परंतु जेमतेम 25-35 वयोगटातील या तरुण शेतकर्‍यांच्या मदतीला गुगल आणि युट्यूब ही माध्यमे आली.

मार्च 2020मध्ये तरुण शेतकर्‍यांनी भाजीपाला शेती कशी करायची याची माहिती इंटरनेटच्या माध्यमातून घेण्यास सुरुवात केली. या माहितीचा अभ्यास त्यांनी काही दिवस केला. मग एप्रिल महिना सुरू होताच या तरुणांनी ट्रॅक्टरच्या माध्यमातून जमीन उकरून काढून भाजीपाला लावण्यासाठी आळी करणे, पाट करणे अशी कामे करून घेतली. त्या वेळी कोणत्याही शेतीसाठी महत्त्वाच्या असलेल्या पाण्याची व्यवस्था जवळून वाहणार्‍या उल्हास नदीतून पंप लावून, तर काही भागात कावड तयार करून केली. शेतापर्यंत पाणी आले.

लॉकडाऊनमुळे सर्वत्र घरात बसून टीव्ही पाहत असताना या चार तरुण शेतकर्‍यांनी भाजीपाला शेती करण्यासाठी आपला वेळ सत्कारणी लावला. त्यांनी चार एकरमध्ये कुटुंबातील सदस्यांच्या मदतीने भेंडी, शेपू, टोमॅटो, मिरची, गवार, वांगी, काकडी, मेथी, कोथिंबीर, माठ, पालक अशा प्रकारच्या भाजीपाल्याचे उत्पादन सुरू केले. त्याचवेळी उन्हाळ्यात आपल्या घरातील जनावरांसाठी चारा आणि मका यांचेही पीक शेतात घेतले. त्यातून त्यांना चांगले उत्पन्न मिळत आहे.

आम्ही इतरांप्रमाणे लॉकडाऊनमध्ये घरी न बसता भाजीपाला शेती करण्याचा निर्णय घेतला. त्या वेळी आमच्या कुटुंबातील सर्वांनी प्रसंगी नदीमधून डोक्यावर पाणी आणण्याचेही काम केले. सर्वांच्या प्रयत्नातून आनंद देणारा मळा फुलला आहे.

-संदीप मसणे, शेतकरी

आम्ही नोकर्‍या करून निवृत्त झालो आहोत. कामावर असताना कधी स्वस्थ बसलो नाही. टाळेबंदीतही घरात बसून न राहता सर्वांना शेती करण्याचा सल्ला दिला आणि त्यांनी माझ्यासह त्यांचा अन्य सहकारी दिलीप शेळके यांचे ऐकले. त्यातून खर्‍या अर्थाने त्यांच्या मेहनतीमधून मळा फुलला असून, भविष्यातही तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता वेगवेगळ्या प्रकारची शेती करावी.

-शांताराम शेळके, ग्रामस्थ

Check Also

कोप्रोली येथे पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ

भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्र सरकारची महत्त्वपूर्ण योजना …

Leave a Reply