पनवेल ः बातमीदार
मुंबईनंतर नवी मुंबईतील पोलिसांनाही कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात आजवर 23 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला असून, सात कर्मचारी बरे झाले आहेत. मुखपट्टीचा वापर न करणे, योग्य सामाजिक अंतर पोलिसांकडून ठेवले जात नाही. त्यामुळे संसर्ग वाढत असल्याने सुरक्षा नियमांचे काटेकार पालन करण्यास सांगण्यात आले आहे.
नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात मुंबईच्या तुलनेत पोलिसांवर ताण कमी आहे. दाट लोकवस्ती वा छोटे रस्ते नसल्याने पोलिसांना सामाजिक अंतर पाळणे सहज शक्य आहे, मात्र तरीही 23 पोलिसांना आतापर्यंत कोरोना झाल्याने पोलीस आयुक्तालय सतर्क झाले आहे. आयुक्त संजय कुमार यांनी यासंदर्भात एक समिती स्थापन केली असून त्याचे नेतृत्व सहाय्यक पोलीस आयुक्तांकडे दिले आहे. आयुक्तालय क्षेत्रातील 20 पोलीस ठाण्यांतील पोलीस कर्मचार्यांच्या सुरक्षेची काळजी घेतली जाणार आहे.
पोलिसांना मुखपट्टी, जंतुनाशकांचा पुरवठा करणे, पोलीस ठाणे निर्जंतुकीकरण करणे, कर्मचारी आजारी असल्यास त्यांची काळजी घेणे आदी जबाबदार्या त्यांच्यावर सोपविण्यात आल्या आहेत. दररोज यासंदर्भात अहवाल देणेही बंधनकारक करण्यात आले आहे.