‘निसर्ग’ चक्रीवादळाच्या तडाख्यात रायगड जिल्ह्याची अपरिमित हानी झाली आहे. संपूर्ण जिल्हाभरात असंख्य झाडे उन्मळून पडली आहेत. घरांची पडझड झाल्याने कित्येकांचे संसार उघड्यावर आले आहेत. मच्छिमार बांधवांचेही नुकसान झाले आहे. अशात राज्य सरकारने अवघी 100 कोटी रुपयांची तातडीची मदत जाहीर केली आहे. पंचनाम्यांनंतर तरी तातडीने सुयोग्य आर्थिक मदत सरकारकडून मिळेल अशी अपेक्षा आहे. ‘निसर्ग’ चक्रीवादळ अलिबागच्या आसपास धडकणार असा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त झाल्यानंतरच खरे तर रायगड जिल्ह्याला वादळाचा मोठा तडाखा बसणार याची पूर्वकल्पना सर्व संबंधितांना आली होती. परंतु वाटले होते त्यापेक्षाही अधिक नुकसान या चक्रीवादळाने केले आहे. चक्रीवादळामुळे मोठी जीवितहानी होऊ नये म्हणून किनारपट्टीनजीकच्या अनेकांना सरकारी यंत्रणेने सुरक्षित स्थळी हलवले. परंतु यापैकी अनेकांना पुढील काही दिवसांसाठी सर्व सोयीसुविधांनिशी निवारा द्यावा लागेल याचा विचार बहुदा यंत्रणेने केला नसावा. ‘निसर्ग’ चक्रीवादळाने अनेकांचे संसार उद्ध्वस्त केले आहेत. त्यांच्या दु:खाची कल्पना करता येणार नाही. अशांना तातडीची मदत म्हणून राज्य सरकारने 100 कोटी रुपयांची मदत शुक्रवारी जाहीर केली. ही रक्कम तुटपुंजीच आहे. किमान ती शक्य तितक्या लवकर संबंधितांपर्यंत पोहोचवून त्यांना दिलासा मिळेल असे पाहिले गेले पाहिजे. अंतिम मदत पंचनाम्यांनंतर जाहीर करू असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी रायगड जिल्ह्याचा दौरा केल्यानंतर म्हटले आहे. पंचनाम्यांसाठी आठ-दहा दिवस लागतील हेही त्यांनी नमूद केले. या आठ-दहा दिवसांत रायगड जिल्ह्यातील नुकसानीचा विषय मागे पडता कामा नये. पंचनाम्यांचे सोपस्कार पार पडून अंतिम आर्थिक मदत जाहीर व्हायला आणखी काही दिवस जातील. राज्यासमोर कोरोनाचे मोठे संकट आहेच. त्यात रायगड जिल्ह्यातील वादळग्रस्तांकडे दुर्लक्ष व्हायला नको. पंचनामे, निधीची घोषणा व प्रत्यक्षात वादळग्रस्तांपर्यंत आर्थिक मदत पोहोचण्यात बराच काळ जाईल. तोवर त्यांच्या राहण्या-खाण्याच्या सोयीचे काय? मान्सूनचे आगमनही होईलच आता पाठोपाठ. अशात डोक्यावरचे छप्पर गमावून बसलेल्या या लोकांनी कुठे रहायचे याचा विचार संवेदनशीलतेने व्हायला हवा. ‘शिवरायांच्या रायगडाला वादळ परतवून लावण्याची सवय आहे’ हे विधान चमकदार जरुर आहे. परंतु वास्तवात जिल्ह्यातील गोरगरीब वादळग्रस्तांना या तडाख्यातून सावरायचे असेल तर यंत्रणेला वेगाने, कार्यक्षमतेने व संवेदनशीलतेने मदतकार्य पार पाडावे लागेल. वेळेवर आर्थिक मदत न मिळाल्यास रायगड जिल्ह्याची प्रगती निव्वळ खुंटणारच नाही तर जिल्हा अनेक वर्षे मागे जाईल. अनेक गावांमध्ये वादळादरम्यान गायब झालेला वीजपुरवठा अद्याप सुरू झालेला नाही. या सार्याकडे सरकारी यंत्रणेने बारकाईने लक्ष द्यायला हवे आहे. अन्यथा राज्यासमोर कोरोनाचे संकट मोठे आहे. त्या आघाडीवरील परिस्थितीही दिवसेंदिवस बिकटच होत चालली आहे. त्या पार्श्वभूमीवर रायगडाकडे दुर्लक्ष होता कामा नये. राज्याने कोरोनाबाधित रुग्णांचा 80 हजारांचा आकडा ओलांडला आहे. दुर्दैवाने कोरोनामुळे मृत्यूमुखी पडणार्यांची राज्यातील संख्याही वाढतेच आहे. गेल्या 24 तासांत अशा 139 कोरोना बळींची नोंद राज्यात झाली आहे. गुरूवारी संपलेल्या 24 तासांतही 123 बळी नोंदले गेले होते. हे अवघे चित्र चिंता वाढवणारेच आहे. अशात रायगड जिल्ह्याला सावरण्याचा विसर कुणाला पडता कामा नये.
Check Also
कळंबोलीत रंगणार कुस्त्यांचा आखाडा
विजेत्याला मिळणार पाच लाख रुपये व मानाची गदा पनवेल : प्रतिनिधीउदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय …