नुकसान झालेल्या आदिवासींची विचारपूस
पनवेल : रामप्रहर वृत्त
निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यात मोठी हानी झाली आहे. याचा फटका पनवेल तालुक्यात आदिवासी वाड्या आणि पाड्यांना सर्वाधिक बसला. त्यामुळे आदिवासी बांधवांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे रायगड उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष व कार्यतत्पर आमदार प्रशांत ठाकूर यांनी शुक्रवारी
(दि. 5) वादळग्रस्त आदिवासी वाडे आणि पाड्यांमध्ये जाऊन पाहणी केली तसेच नुकसानग्रस्तांची विचारपूस करून त्यांना दिलासा दिला.
या पाहणी दौर्यात भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, सरचिटणीस राजेंद्र पाटील, पं. स. सदस्य भूपेंद्र पाटील, राज पाटील हेही उपस्थित होते.
निसर्ग चक्रीवादळात पनवेल तालुक्यामध्ये जवळपास दोन हजार घरांची पडझड झाली आहे. दीड हजारांच्या आसपास झाडे उन्मळून पडली. सव्वादोनशे एकर शेतीचे नुकसान झाले आहे. सुदैवाने तालुक्यात जीवित हानी झाली नाही, मात्र वित्त हानी मोठ्या प्रमाणात झाली आहे. वादळाचा तडाखा तालुक्यातील नेरे आणि शिरवली परिसराला मोठ्या प्रमाणात बसला. विशेषकरून आदिवासी वाड्या-पाड्यांवर मोठे नुकसान झाले आहे. अनेक आदिवासी बांधवांच्या घरांचे पत्रे उडून गेले आहेत, तर काहींच्या घरांच्या भिंतीची पडझड झाली.
कोरोना या वैश्विक संकटात अगोदरच हवालदिल झालेल्या आदिवासींच्या वाड्या-पाड्यांवर चक्रीवादळाची अवकृपा होऊन नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी शुक्रवारी नुकसानग्रस्त भागात जाऊन पाहणी केली. त्यांनी टावर आणि सतीच्या वाडीला सुरुवातीला भेट दिली. त्या ठिकाणी नुकसानग्रस्त आदिवासी कुटुंबांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर लवकरात लवकर पंचनामे करून संबंधित वादळग्रस्तांना शासकीय मदत मिळवून देण्याची ग्वाही दिली. त्यानंतर इतर ठिकाणीही जाऊन त्यांनी पाहणी केली.