Breaking News

नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत करा

भाजप तालुकाध्यक्ष शर्मिला सत्वे यांची मागणी

माणगाव ः प्रतिनिधी

कोरोनाच्या संकटकाळातच रायगड जिल्ह्याला निसर्ग चक्रीवादळाचा जबरदस्त तडाखा बसून गोरगरिबांच्या घरांची पडझड होऊन बागायतदारांचेही प्रचंड नुकसान झाले आहे. अशा वेळी रायगडवासीयांवर ओढवलेल्या संकटात राज्य सरकारमधील मंत्र्यांनी दौरे करण्यात वेळ घालविण्यापेक्षा नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत करावी, अशी मागणी माणगाव तालुका भारतीय जनता पक्ष कामगार आघाडीच्या तालुकाध्यक्ष शर्मिला सत्वे यांनी केली आहे.

शर्मिला सत्वे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, गेल्या तीन महिन्यांपासून रायगडवासीय कोरोनाच्या संकटात आहेत. लॉकडाऊनमुळे सर्वांचेच उद्योगधंदे, व्यवसाय बंद पडल्याने हाल झाले आहेत. अशा परिस्थितीत आलेल्या निसर्ग चक्रीवादळाने रायगडवासियांचे प्रचंड नुकसान झाले आहे. चक्रीवादळाचा तडाखा माणगावला मोठ्या प्रमाणात बसला आहे. विजेचे पोल पडून तालुक्यात सर्वत्र विजेची समस्या निर्माण झाली. वीज नसल्याने बँकांचे व्यवहार ठप्प झाल्याने जनतेला आपले पैसेही काढता येत नाहीत.

या पार्श्वभूमीवर राज्य सरकार तसेच मंत्र्यांनी विशेष लक्ष देऊन दौरे करण्यापेक्षा प्रशासनाकडून तत्काळ पंचनामे मागवून घेऊन गरिबांपर्यंत जलदगतीने मदत पोहचवणे आवश्यक आहे. मंत्री दौरे करून नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यात वेळ घालवत असल्याने प्रशासकीय अधिकार्‍यांचा संपूर्ण दिवस त्या दौर्‍यात जात आहे. त्यामुळे हे दौरे महत्त्वाचे नसून गरिबांना तत्काळ मदत कशी मिळेल याकडे राज्य शासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी तालुकाध्यक्ष शर्मिला सत्वे यांनी केली आहे.

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply