Breaking News

कर्जत-कल्याण एसटी सेवा सुरू करावी; कामगारांची मागणी

कर्जत ः बातमीदार

कर्जत तालुक्यातील लोकांचा सर्वाधिक प्रवास उपनगरीय लोकलने होतो, मात्र लोकल सेवा बंद असल्याने राज्य परिवहन मंडळाने कल्याणपर्यंत एसटीची सेवा सुरू करण्याची मागणी कामगारवर्गातून करण्यात येत आहे.

लॉकडाऊनमुळे बंद असलेली एसटी राज्य परिवहन मंडळाकडून सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यात एसटीची सेवा कर्जत आगारातून सुरू करण्यात आली आहे. ज्या ठिकाणासाठी एसटीची सेवा सुरू करण्यात आली त्या भागात म्हणजे पनवेल व अलिबाग येथे जाण्यासाठी या एसटी गाड्या सुरू करण्यात आल्या. त्या भागातून शासकीय कामासाठी जाणार्‍यांची संख्या मोठी आहे, मात्र सर्व शासकीय कार्यालयातील जनतेची कामे लॉकडाऊनमुळे बंद आहेत. त्यामुळे फार कमी प्रमाणात प्रवासी एसटी गाड्यांमध्ये दिसतात. पनवेलहून नवी मुंबईत नोकरीसाठी जाणार्‍यांची संख्या मोठी असून पनवेलकडे जाणार्‍या एसटी गाड्यांचा अलिबाग आणि पनवेलच्या तुलनेत फायदा होत आहे.

कर्जतला सरळ मार्ग असलेल्या कल्याण व मुरबाडसाठी एसटीची सेवा सुरू करण्याची मागणी आता पुढे आली आहे. कर्जतमधील सर्वाधिक तरुण हे खोपोली-खालापूर व बदलापूर-अंबरनाथ-उल्हासनगर येथे नोकरीसाठी जातात.त्यांना बदलापूरपासून कल्याणपर्यंत जाण्यासाठी एसटीची आवशयकता आहे. कर्जत येथून सकाळ-संध्याकाळ कल्याणकडे जाण्यासाठी एसटी सुरू केल्यास कामगारवर्गास लाभ होईल. बदलापूर-कल्याणपर्यंत एमआयडीसीत काम करणारे कामगार मध्यमवर्गीय आहेत. त्यांच्याकडे स्वतःची वाहने नसल्याने कोरोनाच्या काळात ते घरी बसून आहेत. एसटी सेवा सुरू केल्यास एमआयडीसीत जाणारा कामगारवर्ग आपल्या कामाच्या ठिकाणी पोहचू शकतो.

गावातील तरुणांना नोकरीसाठी व लघुउद्योगांना लागणारे साहित्य आणण्यासाठी कल्याणपर्यंत जावे लागते, मात्र ठाणे जिल्ह्यात जाण्यासाठी कोणतीही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नाही. त्यामुळे लोकल बंद असल्याने एसटी सेवा सुरू करावी.

-समीर मसणे, ग्रामपंचायत सदस्य, शेलू

कर्जत एसटी आगारातून यापूर्वी कधी कल्याणसाठी एसटी गाड्या सोडण्यात आल्या नाहीत. त्यामुळे शासनाने त्यासाठी सूचना केल्यास राज्य परिवहन मंडळ विचार करू शकेल, मात्र त्यासाठी रेल्वे प्रशासनाची भूमिका महत्त्वाची असेल.

-शंकर यादव, आगारप्रमुख, कर्जत

अपघातप्रकरणी क्वालीसचालकावर गुन्हा

पेण : प्रतिनिधी

मुंबई-गोवा महामार्गावर हमरापूर फाटा येथील पुलावर क्वालीस गाडी व कंटेनरच्या अपघातात तीन जण जखमी झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणी दादर सागरी पोलीस ठाण्यात क्वालीसचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. क्वालीसचालकाने गाडीत प्रवासी भरून बेदरकारपणे वाहन चालवून पुढे जाणार्‍या कंटेनरला ओव्हरटेक करताना मागून ठोकर मारली होती. या अपघातात क्वालीसमधील तीन प्रवाशांना दुखापत तसेच गाडीचे नुकसान झाले. या प्रकरणी दादर सागरी पोलीस ठाण्यात गु. र. नं. 18/2020 भा. दं. वि. कलम 279, 337, 338, मोटर वाहन अधिनियम 1988चे कलम 184प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्य्क फौजदार एस. पी. म्हात्रे करीत आहेत.

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply