Breaking News

चित्रकला व निबंध स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक प्रदान सोहळा

नवी मुंबई : सिडको वृत्त

वाढत्या शहरीकरणाच्या काळात विद्यार्थ्यांना अग्निसुरक्षेचे महत्त्व व अग्निशमन विभागातर्फे पुरविण्यात येणार्‍या विविध आपत्कालीन सेवा यांची माहिती व्हावी या दृष्टीने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धांना वेगळे महत्त्व आहे, असे उद्गार सिडकोचे मुख्य दक्षता अधिकारी निसार तांबोळी यांनी काढले. सिडको अग्निशमन दलातर्फे अग्निशमन सेवा सप्ताहानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या चित्रकला व निबंध स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिक प्रदान कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी सिडकोतील मुख्य अग्निशमन अधिकारी अरविंद मांडके, जनसंपर्क अधिकारी प्रिया रातांबे, अग्निशमन विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्यासह स्पर्धेतील विजेते विद्यार्थी व त्यांचे पालक उपस्थित होते. या वेळी बोलताना श्री. निसार तांबोली यांनी अग्निशमन सेवेमध्ये महिलांनाही समान संधी उपलब्ध असून, अनेक महिला विविध ठिकाणाच्या अग्निशमन दलांमध्ये तितक्याच कार्यक्षमतेने कर्तव्य बजावत असल्याचे सांगत महिला व विद्यार्थिनींनीही या क्षेत्राकडे मोठ्या प्रमाणावर वळावे, असे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अरविंद मांडके यांनी केले, तसेच अग्निशमन क्षेत्रातील करिअरच्या संधींबद्दलही त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. अग्निशमन सेवा सप्ताह हा 1944 साली एका दुर्घटनेदरम्यान लागलेली आग विझवताना आपले प्राणार्पण करणार्‍या अग्निशमन जवानांच्या स्मृतिप्रीत्यर्थ साजरा करण्यात येतो. अग्निशमन सेवा सप्ताहादरम्यान सिडको अग्निशमन दलातर्फे विविध कार्यक्रमांसह शालेय विद्यार्थ्यांकरिता अग्निशमन या विषयावर आधारित चित्रकला व निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धांमध्ये नवी मुंबई व ठाणे-मुलुंड परिसरातील एकूण 10 शाळांतील एक हजारांहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. चित्रकला स्पर्धेतील तन्मय विश्वकर्मा, श्रेया हिंगे आणि रेवा गिरनार, तर निबंध स्पर्धेतील वृंदा वाथरी, मनाली पाटणकर आणि प्रणतिका पाटील या प्रथम तीन क्रमांकांच्या विजेत्यांसह अन्य विजेत्या विद्यार्थ्यांना या वेळी पारितोषिके प्रदान करण्यात आली. सूत्रसंचालन व आभार प्रिया रातांबे यांनी मानले.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply