तिघांचा मृत्यू; 32 जणांची कोरोनावर मात
पनवेल : प्रतिनिधी
पनवेल तालुक्यात शुक्रवारी (दि. 12) कोरोनाचे 34 नवीन रुग्ण आढळले असून तिघांचा मृत्यू झाला आहे. तर 32 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. महापालिका हद्दीत दिवसभरात 30 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून तळोजा पानाचंद येथील एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे तर 20 रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. पनवेल ग्रामीणमध्ये चार नव्या रूग्णांची नोंद झाली असून दोघांचा मृत्यू झाला आहे. 12 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात सापडलेल्या रुग्णात तीन लहान मुलांचा समावेश आहे. दिवसभरात कामोठे आठ, खारघर नऊ, कळंबोली चार, नवीन पनवेल, तळोजा आणि पनवेलमध्ये प्रत्येकी तीन रुग्ण सापडले असून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
महापालिका क्षेत्रात तळोजा पानाचंद येथील 35 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. कळंबोलीत रोडपाली पार्थ अपार्टमेंट मधील एकाच कुटुंबातील दोन व्यक्ती, सेक्टर 3 मधील एक 10 वर्षीय मुलगा, कामोठे येथे सेक्टर 7 सिंहगड सोसायटीतील एकाच कुटुंबातील दोन लहान मुलांना लागण झाली आहे. खारघरमध्ये सेक्टर 12 शिवम सोसायटीतील 5 वर्षीय मुलाचा त्यामध्ये समावेश आहे. नवीन पनवेलमध्ये सेक्टर 14 येथील ई 1 मधील 53 वर्षीय व्यक्ती, सेक्टर 9 सत्यशरण सोसायटीतील 55 वर्षीय व्यक्ती तसेच खांदा कॉलनीतील तुलसी प्रेरणा सोसायटीतील 37 वर्षीय व्यक्तीचा समावेश आहे. पनवेलमध्ये कच्ची मोहल्ला झुलेवाली मंजील मधील एकाच कुटुंबातील तीन व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तळोजामध्ये पडग्याचा पाडा येथील 26 वर्षीय व्यक्ति आणि तळोजा पानाचंद येथील दोन व्यक्तींचा त्यामध्ये समावेश आहे.
पालिका क्षेत्रात एकूण 891 रुग्ण झाले असून 616 रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 69.14 टक्के आहे. 238 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 37 जणांचा मृत्यू झाला आहे.
उरणमध्ये कोरोनाच्या सात रुग्णांची भर
उरण : वार्ताहर, प्रतिनिधी
उरण तालुक्यात शुक्रवार (दि.12) नवीन सात कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळले. यामध्ये करंजा एक, डाऊरनगर दोन, जेएनपीटी टाऊनशीप दोन, कोटनाका दोन अशी विभागवार आकडेवारी आहे. तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या 177 झाली आहे. त्यातील 159 बरे झालेले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
शुक्रवारी तालुक्यातील करंजा कोंढरी पाडा येथे 60 वर्षीय एक पुरुष कोरोना पॉझिटीव्ह आढळला आहे. उरण -डाऊरनगर येथील एक 29 वर्षीय पुरुष व 24 वर्षी महिलेस कोरोनाची लागण झाली आहे. जेएनपीटी टाउनशिप सेक्टर 1 येथील एक 51 वर्षीय व 29 वर्षीय अशा दोन महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या आहेत. कोटनाका येथील साई-तिसाई बिल्डींगमध्ये एक 36 वर्षीय पुरुषाला कोरोनाची लागण झाली आहे. कोटनाका येथील जरीमरी मंदिर मागे एक 38 वर्षीय पुरुष कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे.
तालुक्यात फक्त 17 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत. त्यातील कामोठे एमजीएम रुग्णालयात चार, पनवेल येथील (कोविड) उपजिल्हा रुग्णालय पनवेल येथे पाच व केअर पॉईंट हॉस्पिटल बोकडवीरा-उरण सहा होम क्वारंटाइन दोन असे कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत व आतापर्यंत एकाचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. शुक्रवारी एक रुग्ण बरा झाल्याने त्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती उरण तहसिलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली.
नवी मुंबईत 126 जण कोरोनामुक्त; 129 नवे बाधित, दोघांचा मृत्यू
नवी मुंबई : बातमीदार
नवी मुंबईत शुक्रवारी (दि. 12) 126 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. तर 129 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. दोन जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची एकूण संख्या 109 झाली आहे. नवी मुंबईत आतापर्यंत एकूण तीन हजार 54 व्यक्ती पोजिटिव्ह असून बरे होऊन परतलेल्या व्यक्तींनी दोन हजाराचा आकडा ओलांडला असून ही संख्या दोन हजार 124 झाली आहे. सध्या नवी मुंबईतील पालिका तसेच विविध खासगी रुग्णालयांत सद्यस्थितीत एक हजार 310 रुग्ण उपचार घेत आहेत. शुक्रवारची बाधितांची विभागवार आकडेवारी पाहिल्यास बेलापूर 17, नेरुळ 13, वाशी 12, तुर्भे 22, कोपरखैरणे 33, घणसोली 19, ऐरोली 8, दिघा 5 असा विभागवार रुग्णांचा समावेश आहे.