अलिबाग : प्रतिनिधी
स्पर्धेच्या युगात पतसंस्थांनी ग्राहकांना तप्तर सेवा देणे गरजेचे असून एनईएफटी, आरटीजीएस, एसएमएस सेवा देता आली पाहिजे, असे प्रतिपादन ‘नेटविन‘ चे मार्केटिंग मॅनेजर जगदिश सूर्यवंशी यांनी अलिबाग येथे केले. राष्ट्रीय सहकार सप्ताह निमित्त अलिबाग येथे तालुक्यांतील सहकारी पतसंस्थांच्या संचालक, पदाधिकार्यांसाठी चर्चासत्र घेण्यात आले. त्यात जगदिश सूर्यवंशी बोलत होते.
या चर्चासत्राच्या प्रास्ताविकात सहाय्यक निबंधक अशोक मोरे यांनी, कोविडच्या पार्श्वभूमीवर संचालकांना लाभांश वितरीत करण्याचे अधिकार प्रदान केले असल्याचे सांगितले. कोविडमुळे पतसंस्थांच्या अडी-अडचणी वाढल्या असून थकबाकी वसुलीसाठी सहकार खात्याने सहकार्य करावे, अशी मागणी जिल्हा महासंघाचे सचिव योगेश मगर यांनी यावेळी केली. रायगड जिल्हा नागरी सहकारी पतसंस्थांचा महासंघ अध्यक्ष अॅड. जे. टी. पाटील यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. महासंघाचे उपाध्यक्ष दिलीप जोशी, सहकार भारतीचे जिल्हा संघटक दिलीप पटेल, महासंघाचे संचालक संजय वानखेडे, जगदिश कवळे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. या चर्चासत्रात अलिबाग तालुक्यांतील पतसंस्थांचे पदाधिकारी व संचालक मंडळ सदस्यांनी मोठया संख्येने उपस्थिती दर्शवली होती. दिलीप जोशी यांनी सहकार गीत गायले तर संचालक जगदिश कवळे यांनी आभार मानले.