खोपोली : प्रतिनिधी
रक्त तपासणी अहवाल चुकीचा दिल्याने एकनाथ दगङू सांगळे (49, रा. लोधीवली खालापूर) यांनी लोधीवली येथील धीरूभाई अंबानी रुग्णालय
व्यवस्थापनाविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याने एकच खळबळ माजली आहे.
एकनाथ सांगळे हे 24 जुलै 2017 रोजी धीरूभाई अंबानी रुग्णालयात तपासणीसाठी गेले होते. त्या वेळी त्या ठिकाणी असलेल्या वार्ङबॉय महेंद्र भुईकोट याने त्यांचे रक्त तपासणीसाठी घेतले होते. तपासणी अवहाल दोन दिवसांनी मिळाल्यानंतर सांगळे यांना अंबानी रुग्णालयातून देण्यात आलेल्या दोन रक्त तपासणी अहवालावर पॅथॉलॉजीमधील सक्षम तपासणी तंत्रज्ञ यांची सही नसल्याचे आढळून आले, तर दोन तपासणी अहवालावर पनवेल येथील ओरोहॅड पॅथॉलॉजी सर्व्हिस पनवेल येथील सही व शिक्का असल्याचे आढळले. अंबानी रुग्णालयातील तंत्रज्ञ यांची सही दोन तपासणी अहवालावर असल्याचे लक्षात आल्यानंतर सांगळे यांनी सदरचा रक्त तपासणी अहवाल ओळखीचे खासगी तज्ञ ङॉक्टरांना दाखविला.त्यावेळी तपासणी अहवालात अनेक त्रुटी व चुका असल्याचे आढळून आले. एकनाथ सांगळे यांनी रुग्णालयाच्या गैरकारभाराबाबत रायगङ जिल्हा शल्यचिकित्सक अजित गवळींकडे तक्रार केली. या तक्रारीची दखल घेत जिल्हा शल्यचिकित्सक यांनी पनवेल ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी ङॉ. नागनाथ पालवे यांना अंबानी रुग्णालयात शहानिशा करण्यासाठी पाठविले होते. डॉ. पालवे यांनीदेखील रक्त तपासणी अहवाल देताना अंबानी रुग्णालयातून हलगर्जीपणा झाल्याचा अहवाल 8 फेब्रुवारी 2018मध्ये जिल्हा शल्य चिकित्सक गवळी यांना दिला. रुग्णालयातील भोंगळ कारभाराबाबत एकनाथ सांगळे यांनी खालापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून सोबत जिल्हा शल्यचिकित्सक यांचे पत्र आणि रक्त तपासणी अहवाल दिला आहे. त्याआधारे खालापूर पोलिसांनी रुग्णालय व्यवस्थापनाविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सपोनि. महेंद्र शेलार करीत आहेत.