छताचे पत्रे उडाले; आठ दिवस वीजपुरवठा खंडित

अलिबाग : प्रतिनिधी
निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा रायगड पोलीस दलाला देखील बसला आहे. जिल्हयातील 16 पोलीस ठाण्यांचे नुकसान झाले आहे. 11 पोलीस चौक्या आणि सात चेकपोस्टची मोडतोड झाली आहे. वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे जिल्हयातील 10 पोलीस ठाणी गुरूवारपर्यंत (दि. 11) म्हणजे तब्बल आठ दिवस अंधारात होती.
चक्रीवादळाचा रायगडच्या पोलीस दलालाही याचा कमीअधिक प्रमाणात फटका बसला आहे. अनेक पोलीस ठाणी बाधित झाली आहेत. माणगाव पोलीस ठाण्यावरील छताचे पत्रे उडाले. ते पोलीस ठाणे आधीच अन्यत्र हलवण्यात आले होते. महत्वाची कागदपत्रे व फर्निचर सुरक्षित राहिले. श्रीवर्धन पोलीस ठाण्यावर झाड उनमळून पडले. गोरेगाव, दिघी सागरी पोलीस ठाण्यांच्या इमारतींवरील पत्रे उडून गेले आहेत. याशिवाय इतर पोलीस ठाण्यांनाही या वादळाचा फटका बसला असून 11 पोलीस चौक्यांची मोडतोड झाली आहे. जिल्हयातील 10 पोलीस ठाणी गुरूवारपर्यंत म्हणजे तब्बल आठ दिवस अंधारात होती.
बिनतारी विभागाची कामगिरी
रायगड पोलिसांनी चक्रीवादळाच्या काळात महत्वपूर्ण कामगिरी बजावली. जेव्हा मोबाइल, दूरध्वनी किंवा वाहतूक यासारखी संपर्क यंत्रणा ठप्प झाली होती तेव्हा केवळ पोलिसांची बिनतारी संदेश यंत्रणा काम करीत होती. श्रीवर्धन येथील बिनतारी संदेश यंत्रणा बंद पडली तेव्हा तातडीने पर्यायी यंत्रणेचा वापर केल्यानेच तेथील आपत्तीची माहिती तातडीने मिळाली. बिनतारी संदेश यंत्रणा अखंडित कार्यरत ठेवणेकामी पोलीस निरीक्षक आर. बी. पाटील व त्यांचे सहकारी अधिकारी यांनी परिश्रम घेतले.
वादळाचा फटका कमीअधिक प्रमाणात 16 पोलीस ठाण्यांना बसला आहे. परंतु आम्ही पर्यायी व्यवस्था केली असून सर्व लवकरच सुरळीत होईल. आम्ही आधीच सर्व तयारी केली होती त्यामुळे बिनतारी संदेश यंत्रणा बंद पडली नाही. त्याचा उपयोग आपत्तीच्या काळात झाला.
-अनिल पारसकर, पोलीस अधीक्षक, रायगड