कर्जत ः बातमीदार – कर्जत तालुका आगरी समाज संघटनेचे आजीव सदस्य हरिश्चंद्र मालू कोळंबेे यांचे नुकतेच निधन झाले. लॉकडाऊन काळात निधन झाल्यानंतर गर्दी जमवून दशक्रिया आणि उत्तरकार्यावर होणारा खर्च टाळून तो निधी समाजाच्या कामासाठी धनादेशाद्वारे देण्यात आला. अशी मोलाची मदत करून त्यांच्या पुत्रांनी नवीन पायंडा पाडला आहे.
चांधईतील ज्येष्ठ नागरिक आणि तालुक्यातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते हरिश्चंद्र कोळंबे (आण्णा) यांचे 2 जूनला निधन झाले. आपल्या वडिलांनी समाजासाठी खूप काही केले आणि त्या समाजाचे आपणही काही देणे लागतो यावर विश्वास असलेल्या महेश कोळंबे आणि कुमार कोळंबे या हरिश्चंद्र कोळंबे यांच्या दोन्ही पुत्रांनी उत्तरकार्य विधीसाठी येणारा मोठा खर्च समाजकार्यासाठी देण्याचा निर्णय घेतला.
महेश कोळंबे यांनी आगरी समाज संघटनेच्या हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील सामाजिक सभागृहाच्या उभारणीसाठी काही रकमेचा धनादेश दिला. हा धनादेश कर्जत तालुका आगरी समाज संघटना अध्यक्ष सावळाराम जाधव यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. या वेळी खजिनदार तुपे महाराज, संघटनेचे ज्येष्ठ सल्लागार वसंत कोळंबे, हिशेब तपासणीस प्रा. विजय कोंडिलकर आदी उपस्थित होते.