बँक ऑफ इंडियाकडून प्रमाणपत्राचे वितरण
कर्जत ः बातमीदार
आदिवासी समाजातील महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आदिवासी ठाकूर कातकरी संघटना पुढे सरसावली आहे. त्या अनुषंगाने बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून आठ दिवसांचे रोजगार निर्मितीची माहिती देणारे प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. आठ दिवस 100 टक्के उपस्थिती लावणार्या 71 आदिवासी महिलांना प्रमाणपत्र देतानाच रोजगाराची हमीही बँकेने दिली. त्यामुळे हे प्रशिक्षण शिबिर यशस्वी झाल्याचा दावा आयोजक मनोहर पादिर यांनी केला आहे.
आदिवासी ठाकूर कातकरी सेवा संघाच्या माध्यमातून व बँक ऑफ इंडिया स्टार स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थान, अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने कर्जत तालुक्यातील पाथरज ग्रामपंचायतमधील बांगरवाडी येथे आदिवासी महिलांसाठी पापड, लोणचे, मसाले बनविण्याच्या 10 दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कर्जत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी बालाजी पुरी होते, तर व्यासपीठावर बँक ऑफ इंडिया स्टार स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था, अलिबागचे संचालक डॉ. विजयकुमार कुलकर्णी, आदिवासी ठाकूर समाज सेवा मंडळ महाराष्ट्रचे अध्यक्ष मनोहर पादिर, तालुका अध्यक्ष चाहू सराई, सचिव धर्मा निर्गुडा, कनिष्ठ अभियंता गोवर्धन नखाते, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोनती अभियानाचे राजू नेमाडे, प्रभाग समन्वयक राम हणमंते, सरपंच जोत्स्ना घोडविंदे, प्रशिक्षक जयश्री बडेकर उपस्थित होते.
बँक ऑफ इंडियाचे क्षेत्रीय अधिकारी विनयकुमार कुलकर्णी यांनी सांगितले की, आदिवासी महिला प्रशिक्षणाला 100 टक्के उपस्थिती लावत आहेत. व्यवसाय व विपणन कौशल्य आत्मसात करून त्या खंबीरपणे बोलू लागल्या आहेत. त्यांची मानसिकता बदलण्याचे आव्हान आम्ही लीलया पेलले हेच आमचे यश आहे. बंगलोर येथून घेण्यात आलेल्या ऑनलाइन परीक्षा व मुलाखतीत ज्या महिला उत्तीर्ण झाल्या त्यांची नावेही त्यांनी जाहीर केली.
अध्यक्षीय भाषणात कर्जत पंचायत समिती गटविकास अधिकारी बालाजी पुरी यांनी बँकेनेच प्रशिक्षण आयोजित केल्याने स्वयंरोजगार उपलब्ध होण्यास कोणतीही अडचण येणार नाही, असा विश्वास व्यक्त केला. आपण सेवेत असेपर्यंत अशा उपक्रमासाठी पूर्ण सहकार्य करून सामूहिकरीत्या आदर्श कार्य उभे करू, अशी ग्वाही त्यांनी या वेळी दिली. कृषी संशोधन केंद्राचे डॉ. रवींद्र मर्दाने म्हणाले की, संयोजकांनी भविष्याचा वेध घेत प्रशिक्षण, जागा, आर्थिक तरतूद व विपणन व्यवस्था केल्याने यशाची दारे आपोआपच मोकळी होतील. तसेच राजू नेमाडे यांनी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोनती कार्यक्रमाची माहिती दिली. या वेळी प्रशिक्षण घेतलेल्या सरिता गावंडा, सुनीता शेंडगे, सोनम निर्गुडा, दीपा भगत, वैशाली दुदा यांनी मनोगत व्यक्त केले.