Breaking News

कोरोना रुग्णसंख्येचा देशात नवा विक्रम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील कोरोनाचे संकट अधिक गडद होताना दिसत आहे. शनिवारी (दि. 13) सकाळी संपलेल्या 24 तासांत देशात 11 हजार 458 नवे रुग्ण आढळले असून, देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा तीन लाख आठ हजार 993वर पोहोचला आहे. एका दिवसात सर्वाधिक नवे रुग्ण आढळल्याचा हा विक्रम आहे. याशिवाय मागील 24 तासांत 386 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
सध्याच्या घडीला देशात एक लाख 45 हजारहून अधिक रुग्ण असून, एक लाख 54 हजारपेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, तर देशात आतापर्यंत आठ हजार आठशेच्या पुढे लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या रुग्णांमध्ये भारत जगात चौथ्या क्रमांकावर आहे. असेच आकडे वाढत राहिले तर भारत चौथा क्रमांकही मागे टाकेल, अशी शक्यता आहे.
जगभरात कोरोनाची दहशत पाहायला मिळत असून, यावर नियंत्रण मिळवण्यासाठी अनेक देशांनी लॉकडाऊनचा निर्णय घेतला. देशात दोन महिन्यांहून अधिक काळ लॉकडाऊन होता, पण आर्थिक समस्या दूर करण्यासाठी वेगवेगळ्या भागात लॉकडाऊनमध्ये सूट देण्यात आली आहे. एकीकडे या हालचाली सुरू असताना चंदीगडमध्ये परिस्थिती पुन्हा निर्बंधमय होताना दिसते. कोरोना विषाणूचा वाढता धोका लक्षात घेत चंदिगडमध्ये आंतरराज्यातील बससेवा पूर्णत: स्थगित करण्यात आली आहे.
महाराष्ट्राने टाकले चीन, कॅनडाला मागे
कोरोनाग्रस्तांच्या आकड्यात महाराष्ट्राने देशात अव्वल स्थान कायम राखत लाखाचा टप्पा पार केला आहे. गेल्या 24 तासांत राज्यात 3493 नवीन रुग्णांची भर पडली. एकट्या मुंबईतच 1372 नवीन प्रकरणांची नोंद झाली. कॅनडा आणि चीनमध्ये आढळलेल्या करोना रुग्णांपेक्षाही अधिक रुग्णसंख्या सध्या महाराष्ट्रात आहे. यापाठोपाठ तमिळनाडू राज्याचा नंबर लागतो. तेथे 40 हजारहून अधिक रुग्ण आढळले आहेत, तर देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत 36 हजारहून अधिक रुग्ण आहेत.

Check Also

गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, नैना, पायाभूत सुविधासंदर्भात योग्य नियोजन व्हावे

आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, …

Leave a Reply