उरण ः प्रतिनिधी : उरण तालुक्यातील विजेचा लपंडाव व समस्यांचा पाढाच ग्रामस्थांनी वीज मंडळाच्या अधिकार्यांसमोर वाचला. यानंतर अधिकार्यांनी नेहमीच्या पद्धतीने लवकरच समस्या सोडवू, असे आश्वासन दिले. या वेळी उपस्थित ग्रामस्थांच्या भावनांचा उद्रेक झाला होता.
उरण परिसरात विजेचा लपंडाव सुरू आहे. याबाबत अनेक वेळा तक्रारी करूनसुद्धा मार्ग निघत नव्हता. दोन दिवसांपूर्वी उरण बोरी गावातील डीपीचा स्फोट झाला होता. त्यावेळी पूर्ण गाव अंधारात होते. रात्री ग्रामस्थ उरण वीज मंडळाच्या कार्यालयात गेले असता त्या ठिकाणी जबाबदारी घेण्यासाठी कोणीही अधिकारी उपस्थित नव्हता. त्यांना फोन करूनही प्रतिसाद दिला जात नव्हता. त्यानंतर ग्रामस्थांनी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार केल्यानंतर पोलिसांनी संबंधित अधिकार्यांना फोन करूनही अधिकार्यांनी वेळ मारून नेली, पण रात्रभर वीज काही आली नाही. त्यानंतरही विजेचा लपंडाव सुरूच आहे. यासंदर्भात चर्चा करण्यासाठी बैठक बोलाविण्यात आली होती. ती बैठकही पुढे ढकलण्याचा प्रयत्न होता, परंतु हा प्रयत्न ग्रामस्थांनी हाणून पाडत बैठक घेण्यास भाग पाडले.