पाली : प्रतिनिधी
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर समुद्रातील मासेमारी बंद झाली आहे. सध्या चिकन, मटणाचे भावदेखील वधारले आहेत. अशा वेळी खेकडे (मुठे) खवय्यांना आकर्षित करीत आहेत. कोवळ्या गवतावर गुजराण करणारे आणि फक्त पावसाच्या सुरुवातीलाच मिळणार्या चविष्ट आणि लज्जतदार मुठ्यांना मागणी वाढत आहे.
पहिल्या पावसात उगवलेले कोवळे गवत खाण्यासाठी मुठे बाहेर पडतात. माळराण, शेत, डोंगर, ओहळ, नदी आणि खाडीकिनारी ते सापडतात. मुठे पकडण्यासाठी खवय्ये हातात गॅसबत्ती, टॉर्च किंवा जळता टायर घेऊन घराबाहेर पडतात. सोबत मुठे ठेवण्यासाठी सिमेंटचे पोते किंवा गोणपाट असते. रात्रभर माळराण, शेत, गवताळ भाग किंवा डोंगर उतारवर फिरून मुठे पकडले जातात. बत्तीच्या किंवा टॉर्चच्या उजेडात हे मुठे थांबतात. मग दबक्या पावलांनी जाऊन त्यांना पकडून पोत्यात टाकले जाते. कधी कधी मात्र बराच वेळ फिरूनसुद्धा मुठे हाती लागत नाहीत. त्यासाठी निसर्गाची साथ असावी लागते.
पाऊस पडू लागल्याने मुठे उपलब्ध होऊ लागले आहेत. शहरात 100 ते 120 रुपये डझन या दराने मुठे मिळतात, मात्र कोरोना आणि लॉकडाऊनमुळे मुठे मिळत नसल्याने शहरातील खवय्ये नाराज आहेत.
-पौष्टिक व आरोग्यवर्धक
आकाराने लहान असले तरी मुठ्यांचे मांस चविष्ट, पौष्टिक व आरोग्यवर्धक असते. मुठे वेगवेगळ्या प्रकारे आणि पद्धतीने बनवून खाल्ले जातात. त्यातील सर्वांत प्रसिद्ध पद्धत म्हणजे मुठ्यांचे कवच काढून त्यामध्ये मूग, तांदूळ किंवा चण्याच्या पिठाचे मिश्रण भरून करणे. हे मिश्रण भरल्यावर धाग्याने पुन्हा कवच बांधून कालवण तयार केले जाते. आतील गराबरोबरच हे भरलेले मिश्रण लज्जतदार लागते.
पावसाळ्यात आढळणारे मुठे चविष्ट असतात. त्यासाठी आम्ही पावसाची वाट पाहत असतो. शहरातील खवय्यांकडूनदेखील मुठ्यांना मोठी मागणी असते. -संतोष बावधाने, मुठे पकडणार