Breaking News

कशेडी घाटातील भुयारी मार्ग पूर्णत्वाकडे

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटाला पर्यायी म्हणून भुयारी मार्ग काढण्यात येत आहेत. त्यापैकी एक भुयार नुकतेच आरपार झाले असून दुसरे भुयारही लवकरच आरपार होऊन या वर्षअखेरीस, भुयारी मार्गाचे काम पूर्ण होऊन 2022 मध्ये लोकार्पण केले जाणार आहे, अशी माहिती या भुयारी मार्गाचे इन्चार्ज नितीन रंजन यांनी प्रत्यक्ष भुयारी मार्गाचे कामकाज दाखविताना दिली.

मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण करण्यास 2009 मध्ये मान्यता मिळाली. त्यात फ्लायओव्हर, अंडरपास, बॉक्स कटिंग वगैरेची तरतूद आहे. पोलादपूर तालुक्यातील कशेडी घाटाला पर्यायी मार्ग म्हणून भुयारी (बोगदे) मार्गाची निविदा निघाली आणि या चौपदरीकरणाच्या कोंदणातील भुयारी मार्ग हीरा ठरणार आहे, हे स्पष्ट झाले.

कशेडी घाटामध्ये मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण शक्य नसल्याने भारतीय पद्धतीचा भुयारी मार्ग खणून रस्ता करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या घाटातील प्रस्तावित 3.44 किलोमीटर लांबीचा बोगदा तयार करण्याचे काम रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने स्वीकारले असून 441 कोटी रुपयांचा खर्च या कामी होणे अपेक्षित आहे.

कशेडी घाटातील प्रस्तावित बोगदा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बनविताना तीन पदरी दोन भुयारी मार्ग तयार करण्यात येत आहेत. यातील करारानुसार 7.2 किलोमीटर लांबीचा आधुनिक दर्जाचा पक्का रस्ताही प्रस्तावित असून या रस्त्याचे कामदेखील रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच करीत आहे.

हा भुयारी मार्ग खोदण्यासाठी अत्याधुनिक यंत्र म्हणजेच बुमर वापरण्यात येत असून याद्वारे तीन ते चार मीटर लांबीचे कातळ फोडले जात आहेत. 20 मीटर रुंदी आणि 6.5 मीटर उंची अशा पद्धतीने भुयारी मार्गाचे खोदकाम करण्यास बूमर यंत्राचा उपयोग होत आहे. भुयारी मार्गामध्ये महत्त्वाच्या ठिकाणी सुरुंग स्फोटासाठी जिलेटिनचा वापर केला जात असून भुयारामध्ये पडलेले कातळ व मोठमोठे दगड बाहेर काढण्यासाठी अजस्त्र यंत्रांचा वापर केला जात आहे. हे कातळाचे दगड मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरण कामांमध्ये वापरण्यात येत आहेत. दोन्ही भुयारी मार्ग एकमेकांपासून वेगवेगळे असणार आहेत.

राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी 14 जुलै 2019 रोजी अभियंत्यांसोबत या कामाची पाहणी केली होती. तब्बल दोन वर्षांच्या कालावधीनंतर दोनपैकी एक भुयार आरपार खुले झाले आहे.

या भुयारी मार्गाच्या दुतर्फा अ‍ॅप्रोच रस्ते तयार करण्यात आले आहेत. आपत्कालामध्ये उपयुक्त असलेल्या वायुविजन सुविधेचे एक भुयारदेखील यामध्ये समाविष्ट असून पोलादपूर बाजूच्या पहिल्या अर्धा किमी. अंतराच्या टप्प्यामध्ये दोन्ही भुयारी मार्गांना जोडणार्‍या कनेक्टिव्हिटीचा भुयारी मार्ग तयार झाला आहे. आतील भागात यूटर्न घेणार्‍या वाहनांसह अपघातग्रस्त वाहनांना बाहेर काढण्याची सुविधा या कनेक्टिव्हिटी भुयारी मार्गाने होणार आहे. 2019 साली नोव्हेंबर महिन्यामध्ये सुरू झालेले हे काम एप्रिल 2021 पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा होती. कोरोना काळामध्ये कामगारांअभावी तीन महिने काम रेंगाळले असले, तरी या वर्षा अखेरीस दुसर्‍या भुयाराचे कामही पूर्ण होणार आहे.

पुढील वर्षी 2022 मध्ये या भुयारी मार्गापर्यंत जाणार्‍या काँक्रीट रस्त्याचे, तसेच भुयाराच्या आतील भागातील काँक्रीटीकरणासह खेड बाजूकडे चार आणि पोलादपूर बाजूकडे तीन पूल उभारण्याचे काम झाल्यानंतर अ‍ॅप्रोच रस्ता पूर्ण होणार आहे. 2022 मध्ये मुंबई-गोवा महामार्गाचा किमान कोकणापर्यंतचा टप्पा, पूल तसेच भुयारासह पूर्ण होऊन त्याचे लोकार्पण होईल, अशी अपेक्षा आहे.

-शैलेश पालकर, खबरबात

Check Also

पेणमध्ये भाजपचा बूथ मेळावा उत्साहात

पेण ः रामप्रहर वृत्त रायगड लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी (दि.14) पेण तालुक्यात भाजपच्या बूथ मेळाव्याचे …

Leave a Reply