सीएसएमटी लोकल सुरू; मात्र अत्यावश्यकचा घोळ
पनवेल : प्रतिनिधी – पनवेल सीएसएमटी लोकल सोमवार (दि. 15) पासून सुरू झाली असली तरी अत्यावश्यकचा घोळ सुरूच आहे. अनेकांचे स्टेशनवर पोलीस आणि रेल्वे कर्मचार्यांजवळ वाद घालत असलेले पहावयास मिळाले. पोलिसांनाही लोकलमध्ये तिकीटा शिवाय प्रवेश नाही. नाराज कर्मचार्यांना कामावर जाण्यासाठी अखेर लालपरीचा आधार घ्यावा लागला.
रविवारी रात्री उशिरा रेल्वे मंत्रालयाकडून अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्यांसाठी सोमवार पासून लोकल सुरू करण्यास परवानगी देण्यात आल्याची माहिती मिळाल्याने सोमवारी पहाटे पासून अत्यावश्यक सेवेसाठी जाणार्या कर्मचार्यांनी पनवेल रेल्वे स्टेशनवर गर्दी करायला सुरुवात केली. रेल्वे स्टेशनच्या मुख्य गेटवर त्यांची तपासणी करून प्रवेश दिला जात होता. तिकीट काढून त्यांना लोकलमध्ये बसण्यास परवानगी देण्यात येत होती. या वेळी ड्युटीवर जाणार्या पोलिसांनाही तिकीट काढल्यावरच प्रवेश देण्यात आला. पनवेलहून सुटणारी लोकल फक्त बेलापुर, नेरूळ, जुईनगर, वाशी, मानखुर्द, कुर्ला, वडाळा आणि सीएसएमटी या स्टेशनवरच थांबणार आहे.
लोकल अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्यांसाठी सुरू केली असल्याने सकाळी बँक व इतर अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्यांना प्रवेश देण्यात आला. पण नंतर त्यामध्ये फक्त सर्व महापालिका, आरोग्य, बेस्ट आणि पोलीस कर्मचारी यांनाच प्रवेश देण्याबाबत सूचना आल्या त्यामुळे इतर अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्यांना प्रवेश नाकरण्यात आला. कामावर
जाण्यासाठी आलेल्या अनेकांना अत्यावश्यकच्या घोळामुळे शेवटी लालपरीचा आधार घ्यावा लागला.