Breaking News

पोलादपूर तालुका झाला कोरोनामुक्त!

संसर्ग टाळण्यासाठी दक्षतेचे आवाहन; सर्व यंत्रणांचे सहकार्य

पोलादपूर ः प्रतिनिधी

तालुक्यात 18 एप्रिल रोजी पहिला कोरोना पॉझिटिव्ह पेशंट आढळल्यानंतर तब्बल दोन महिन्यांच्या कालावधीत कोरोनाचे एकूण 21 रुग्ण आढळून आले. शेवटचे सात रुग्ण होम आयसोलेशन करून देखभाल व वैद्यकीय तपासणी करण्यात आल्यानंतर मंगळवारी (दि. 16) दुपारी अधिकृतरीत्या पोलादपूर तालुका कोरोनामुक्त झाल्याची घोषणा तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. गुलाबराव सोनावणे यांनी केली. दरम्यान, पोलादपूर तालुका कोरोनामुक्त राहण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग, मास्क लावणे, सॅनिटायझरचा नियमित वापर, साबणाने हात धुणे अशी दक्षता घेण्याचे आवाहन आयुषचे डॉ. राजेश शिंदे यांनी केले आहे.

पोलादपूर शहरातील प्रभातनगर येथील एका महिलेला कोरोना झाल्याचा रिपोर्ट 18 एप्रिल रोजी आल्यानंतर केवळ 24 तासांतच तिचा कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण तालुक्यामध्ये कोरोनाची दहशत पसरू लागली. याच महिलेचा पती 21 एप्रिल रोजी कोरोना पॉझिटिव्ह असल्याने मुंबईला फोर्टीज हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी पाठविण्यात आले. यानंतर पळचिल येथील एक आणि कापडे बुद्रुक ग्रुपग्रामपंचायत हद्दीतील निवाचीवाडी गावातील दोन रुग्णांची कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर उमरठ फौजदारवाडी येथील एका रुग्णाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यांना अलिबाग येथे उपचारासाठी पाठविण्यात आले.

उमरठ येथील आणखी तीन जण कोविड पॉझिटिव्ह आढळले. पाठोपाठ तुर्भे बुद्रुक येथील दोन जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. या रुग्णांवर महाड येथील कोविड सेंटरमध्ये उपचार करण्यात आले. चांभारगणी ग्रुपग्रामपंचायत हद्दीतील निवे गावातील एका घरात आलेल्या 11 जणांपैकी तीन जण कोरोना पॉझिटिव्ह निष्पन्न झाल्यानंतर अन्य जणांचे स्वॅब पाठविल्यानंतर 1 जून रोजी सात जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे दिसून आले. अशा प्रकारे निवे येथे 11 पैकी 10 जणांची कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने गांभीर्य अधिकच वाढले.

यामुळे पोलादपूर तालुक्यातील कोविड पॉझिटिव्ह असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या 21वर पोहचली, मात्र शेवटच्या सात कोविड  पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे नसल्याने घरच्या घरी होम आयसोलेशन पद्धतीने उपचार करण्यात आले. त्यांच्या आरोग्य तपासणीनंतर सर्व कोरोनामुक्त असल्याचे अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आले.

पोलादपूर तालुका कोरोनामुक्त होण्यासाठी इन्सिडंट कमांडर तथा तहसीलदार दीप्ती देसाई, गटविकास अधिकारी डॉ. भूषण जोशी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सोनावणे, ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षिका डॉ. भाग्यरेखा पाटील, डॉ. राजेश शिंदे, पळचिल प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉ. बारोडे मॅडमसह अन्य डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी, आशा सेविका, परिचारिका तसेच संपूर्ण शासकीय यंत्रणेने महाड कोविड सेंटर आणि जिल्हा आरोग्य यंत्रणेच्या मार्गदर्शनाखाली योग्य उपाययोजना केल्या.

पोलादपूर तालुक्यातील रुग्ण आणि रुग्णांच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी योग्य सहकार्य केल्याने तब्बल दोन महिन्यांच्या कालावधीत पोलादपूर तालुका कोरोनामुक्त झाल्याची घोषणा करताना आनंद वाटत असल्याचे या वेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. गुलाबराव सोनावणे यांनी सांगितले.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply