Breaking News

उरणमध्ये आढळले सात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

उरण ः प्रतिनिधी

उरण परिसरात मंगळवारी (दि. 16) कोरोनाचे सात रुग्ण आढळून आले आहेत. मंगळवारी चाणजे-तांडेलनगर येथील दोन पुरुष, तीन महिला, तर बोरी येथील एक पुरुष व एक महिला असे एकूण सात रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. कोप्रोली येथील 38 वर्षीय रुग्णालाडिस्चार्ज देण्यात आला आहे. उरण तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 189पर्यंत पोहचली आहे. त्यापैकी आजपर्यंत 167 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. उर्वरित 21 पॉझिटिव्ह रुग्णांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू असल्याची माहिती उरणचे तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली आहे.

रायगड जिल्ह्यात 28 मिमी पावसाची नोंद

अलिबाग ः जिमाका

रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासांत सरासरी 28.54 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे.  तसेच 1 जूनपासून आज अखेर एकूण सरासरी 320.31 मिमी पर्जन्यमानाची नोंद झाली. मंगळवारी सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार अलिबाग 28.00 मिमी, पेण 18.00 मिमी, मुरूड 34.00 मिमी, पनवेल 2.20 मिमी, उरण 2.00 मिमी, कर्जत 42.00 मिमी, खालापूर 45.00 मिमी, माणगाव 25.00 मिमी, रोहा 25.00 मिमी, सुधागड 12.00 मिमी, तळा 28.00 मिमी, महाड 12.00 मिमी, पोलादपूर 25.00 मिमी, म्हसळा 42.00 मिमी, श्रीवर्धन 65.00 मिमी, माथेरान 51.40 मिमी असे एकूण पर्जन्यमान 456.60 मिमी इतके आहे. त्याची सरासरी 28.54 मिमी आहे. एकूण सरासरी पर्जन्यमानाची टक्केवारी 10.19 टक्के इतकी आहे.

श्रीवर्धनमधील वादळग्रस्तांची शासनाकडून उपेक्षाच

श्रीवर्धन ः प्रतिनिधी

निसर्ग चक्रीवादळाचा प्रचंड तडाखा बसून तेरावा दिवस उजाडला तरी कोणत्याही प्रकारची मदत श्रीवर्धन तालुक्यातील जनतेला मिळालेली नाही. शासनाकडून किराणा सामान मिळत असले तरी डोक्यावर छप्पर नसल्यामुळे ते शिजवायचे कुठे, असा प्रश्न नागरिकांना भेडसावत आहे. अनेकांनी आपल्या घरात असलेले सोन्याचे दागिने गहाण ठेवून किंवा उधार उसनवारी पैसे घेऊन घरांची छपरे दुरुस्त केली आहेत. एकूणच शासनाकडून श्रीवर्धन तालुक्यातील जनतेची उपेक्षाच होत असल्याचे पाहायला मिळत आहे. कोरोनामुळे लॉकडाऊन असल्यामुळे अगोदरच तीन-चार महिने रिकामटेकडे बसलेल्या नागरिकांच्या हातात पैसा नाही.

अरबी समुद्रात तयार झालेल्या निसर्ग चक्रीवादळाने हरिहरेश्वर, श्रीवर्धन किनार्‍यावर 3 जून रोजी जोरदार धडक दिल्याने संपूर्ण श्रीवर्धन तालुका त्याचप्रमाणे सुप्रसिद्ध तीर्थक्षेत्र हरिहरेश्वर पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे. वादळानंतर संपूर्ण तालुक्यातील वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे तसेच मोबाइल नेटवर्क बंद असल्याने कोणाचा कोणाशीही संपर्क होत नव्हता. प्रथमदर्शनी श्रीवर्धन तालुक्यात किती मोठ्या प्रमाणात हानी झाली याचा पत्ताच शासकीय यंत्रणांनाही लागला नव्हता.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply