Breaking News

विद्युत तारांमुळे म्हाडा कॉलनीतील रहिवाशांच्या जीवाला धोका

कर्जत : प्रतिनिधी

म्हाडा कॉलनीतील रहिवाशांच्या जीवाला धोकादायक ठरत असलेले विद्युत पोल स्थलांतरित केव्हा होणार, असा प्रश्न म्हाडा कॉलनीतील रहिवासी विचारत आहेत. कारण अगदी इमारतीच्या कडेने गेलेल्या विद्युत तारा कधीही एखाद्याच्या जीवाला धोका पोहोचवतील.

सुमारे दोन वर्षांपूर्वी महावितरण कार्यालयाने म्हाडा कॉलनीमध्ये रहिवाशांना कुठल्याही प्रकारे विश्वासात न घेता तसेच ‘हम करे सो कायदा’ या उक्तीप्रमाणे अडथळा ठरेल अशाप्रकारे रात्रीच्या वेळेस रस्त्यांच्या मधोमध गटारापासून एक दोन फुटांच्या अंतरावर विद्युत पोल उभे केले आहेत. याबाबत म्हाडा कॉलनीतील रहिवाशांनी मागील दोन वर्षांपासून महावितरणचे उपकार्यकारी अभियंता यांना लेखी पत्रव्यवहार, तसेच कित्येकदा फोनवर संपर्क करून कळविलेले असूनदेखील उपकार्यकारी अभियंता यांनी याबाबत काहीही कारवाई केलेली नाही.

या विद्युत पोलमुळे अनेक वाहनांचे, तसेच नागरिकांचे छोटे-मोठे अपघात झाले आहेत, तसेच भविष्यात प्राणहानी देखील होण्याची दाट शक्यता आहे, परंतु त्याचे गांभीर्य कित्येकदा तक्रार देऊनही वीज वितरण कंपनीला नाही. कर्जत नगर परिषदेच्या नगराध्यक्षा, नगरसेवक, नगरसेविका या लोकप्रतिनिधींच्या तक्रार व विनंती अर्जाची जर महावितरण दखल घेत नसेल तर सर्वसामान्य नागरिकांना महावितरणच्या कर्जत कार्यालयातून काय आणि कशा सुविधा मिळत असतील, हा प्रश्न माहिती अधिकार कार्यकर्ता प्रभाकर गंगावणे यांनी उपस्थित केला आहे.

महावितरणच्या उपकार्यकारी अभियंत्यांनी तातडीने म्हाडा कॉलनीतील धोकादायक विद्युत पोलचे स्थलांतर करून धोकादायक वृक्षाच्या फांद्या तोडाव्यात; अन्यथा भविष्यात एखादी दुर्घटना घडल्यास सर्वस्वी जबाबदारी महावितरणची असेल, असे गंगावणे यांनी सांगितले.

Check Also

करिअरविषयक मार्गदर्शन सत्राला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पनवेल : रामप्रहर वृत्तसध्या जगात एआय तंत्रज्ञानावर आधारित सर्वाधिक संधी असल्यामुळे विद्यार्थ्यांनी एआयसोबत लवकरच परिचित …

Leave a Reply