Breaking News

रायगडात भात लावणीला वेग

अलिबाग, पेण : प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यात काही दिवस पावसाने दडी मारली होती. पावसाला काही प्रमाणात पुन्हा सुरुवात झाल्यामुळे भात लावणीच्या कामाला वेग आला आहे, परंतु पावसाला हवा तसा जोर नसल्याने बळीराजा चिंतेत आहे.
जून महिन्याच्या सुरुवातीला चांगला पाऊस पडल्यामुळे शेतकर्‍यांनी पेरणी करून घेतली होती. भाताची रोपेदेखील चांगली तयार झाली, मात्र मागील काही दिवसांपासून पावसाने ओढ दिल्याने लावणीची कामे खोळंबली होती. आता पावसाला पुन्हा सुरुवात झाल्याने लावणीच्या कामांना काही प्रमाणात सुरुवात झाली आहे, परंतु पाऊस पडला तर वरचेवर सर येऊन जाते. तीसुद्धा एखाद्या ठिकाणीच पडते.
रायगड जिल्ह्यात पूर्वी एक लाख 23 हजार हेक्टर क्षेत्र भात लागवडीखाली होते. विविध कारणांमुळे हे क्षेत्र एक लाख चार हजार हेक्टरपर्यंत घटले आहे. टाळेबंदीमुळे यंदा जिल्ह्यात मुंबईतून मोठ्या प्रमाणात नागरिकांचे स्थलांतर झालेले आहे. त्यामुळे लागवडीखालील क्षेत्र वाढेल, अशी अपेक्षा होती, मात्र कृषी विभागाच्या प्राथमिक सर्वेक्षणानुसार यंदाही सुमारे एक लाख हेक्टर क्षेत्रावरच भाताची लागवड होणे अपेक्षित आहे.
जिल्ह्यात भात लागवड क्षेत्राच्या 10 टक्के म्हणजे 10 हजार हेक्टर क्षेत्रावर भात पेरणी करून रोपे तयार करण्यात आली आहेत. जिल्ह्यातील काही तालुक्यांत भात लावणीच्या कामांना सुरुवातही झाली आहे, तर जिल्ह्याच्या काही भागांत मात्र पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

भाताची रोपे तयार झाली आहेत. जिल्ह्यात पावसाचेे प्रमाणही चांगले आहे. भातरोपांची वाढ समाधानकारक आहे. रोपांवर कोणत्याही प्रकारच्या रोगांचा प्रादुर्भाव झालेला नाही.
-पांडुरंग शेळके, अधीक्षक कृषी अधिकारी, रायगड

Check Also

पोषण आहारात मृत उंदीर सापडल्याच्या घटनेतील तपासणीचे नमुने नाकारणार्‍या प्रयोगशाळांवर कारवाई करणार

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रश्नावर ना.आदिती तटकरेंचे उत्तर पनवेल : रामप्रहर वृत्ततपासणीसाठी पाठवलेले नमुने नाकारणार्‍या …

Leave a Reply