कर्जत : बातमीदार
नेरळ गावातील नालेसफाई पावसाळ्यापूर्वी करण्याचा प्रयत्न ग्रामपंचायत प्रशासनाने सुरू केला आहे. नेरळ गावात 10 किलोमीटरचे मुख्य नाले असून, 12 किलोमीटरचे उपनाले आहेत. पावसाळा डोळ्यासमोर ठेवून त्यांची साफसफाई करण्यास नेरळ ग्रामपंचायतीने सुरुवात केली.
नेरळ ग्रामपंचायत दरवर्षी गावातील मुख्य नाले आणि बाजारपेठ भागातील लहान नाल्यांची साफसफाई करीत असते. नेरळ गावात गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात नागरिकरण झाले असून, त्या शहरीकरणामुळे नेरळ गावातील नाले दररोज सांडपाण्याने वाहत असतात. त्या नाल्यात साचून राहिलेला प्लास्टिक कचरा हा पावसाळ्यात गटारे वाहण्यात अडचणीचे ठरू शकतात, हे लक्षात घेऊन नेरळ ग्रामपंचायतीने लहान नाले आणि मुख्य नाले यांची साफसफाई करण्यास सुरुवात केली आहे.
पावसाळा तोंडावर आला असल्याने नेरळ ग्रामपंचायतने नालेसफाईकडे आपले लक्ष केंद्रित केले आहे. नेरळ गावाच्या बाहेरून वाहणार्या नाल्यात मोठ्या प्रमाणात झाडे आणि झुडपे उगवली असून, ती बाजूला करण्याच्या कामास सरपंच जान्हवी साळुंखे यांच्या उपस्थितीत मोहाचीवाडी येथील पुलाजवळ सुरुवात करण्यात आली. त्यावेळी उपसरपंच अंकुश शेळके तसेच स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.
नेरळ गावात माथेरानच्या डोंगरातून वाहून येणारे पाणी दोन वेगवेगळ्या नाल्यातून खाली येत असते. कोतवालवाडीकडून येणार्या नाल्यातील पाणी खांडा भागातून टॅक्सी स्टॅण्ड येथून रेल्वे पुलाखालून उल्हास नदीला जाऊन मिळते. तर टपालवाडी भागातून येणारा नाला ब्रिटिशकालीन धरणावरून पोलीस ठाण्याजवळून नेरळ टॅक्सी स्टॅण्ड येथे एकत्र होऊन पुढे उल्हास नदीला जाऊन मिळतो. या दोन्ही नाल्यांची लांबी नेरळ ग्रामपंचायत हद्दीत सात किलोमीटरची आहे. या दोन मुख्य नाल्यासह तिसरा नाला हा मातोश्रीनगर भागातून नेरळ-कळंब रस्त्याच्या बाजूने वाहत निर्माण नगरीमधून एसटी स्टॅण्डमार्गे पुढे उल्हास नदीला जाऊन मिळतो. असे 10 किलोमीटरचे मुख्य नाले आणि गावातील अन्य 12 किलोमीटर लांबीचे लहान उपनाले यांच्यातील गाळ, कचरा, झाडेझुडपे काढण्याचे काम ग्रामपंचायतीने सुरू केले आहे.
20 मे नंतर गाळकाढणी सुरू
ग्रामपंचायतीने यापूर्वी ब्रिटिशकालीन धरणातील पाणी सोडून दिले असून, त्या ठिकाणी साचून राहिलेला गाळ आणि माती बाहेर काढण्यात येणार आहे. मात्र तेथील गाळ अद्याप सुकला नसल्याने 20 मेनंतर तेथे गाळ काढण्याच्या कामाला सुरुवात केली जाणार आहे. या कामासाठी नेरळ ग्रामपंचायतीने जेसीबी मशीनची यंत्रणा तयार ठेवली आहे.
नालेसफाईची कामे वेळेवर सुरू झाल्यास नेरळमधील नागरिकांना पावसाळ्यात तुंबलेल्या पाण्याला सामोरे जावे लागणार नाही. मोठ्या नाल्यांची सफाई जेसीबी मशीनच्या सहाय्याने तर लहान नाल्यांची सफाई मनुष्यबळ वापरून केली जाणार आहे.
-राजेंद्र गुडदे, ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत नेरळ