रेवदंडा : प्रतिनिधी
संचारबंदी असताना अलिबाग तालुक्यातील भिलजी येथील विठ्ठल-रूक्मिणी मंदिरात पूजा व आरतीसाठी गावकर्यांना जमविल्याप्रकरणी गावचे पोलीस पाटील, मंदिराचा पुजारी, सचिव याच्यांसह 25 जणांवर रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेत सर्व धार्मिक स्थळे भाविकांसाठी बंद करण्यात आली आहेत. असे असताना भिलजी येथील विठ्ठल-रूक्मिणी मंदिरात शनिवारी (दि. 18 एप्रिल) सायंकाळी सव्वासहा वाजण्याच्या सुमारास पूजा व आरतीसाठी सुमारे 100 ते 125 गावकरी एकत्र जमले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही खबरदारी न घेता तसेच शासनाच्या आदेशाकडे दुर्लक्ष करून गावातील लोक एकत्र जमल्याने गावचे पोलीस पाटील अनंत नारायण पुनकर, मंदिराचे पुजारी अनंत नानू ठाकूर, मंदिराचे सचिव दत्तात्रेय हाशा भोईर यांच्यासह 25 जणावर रेवदंडा पोलीस ठाण्यात भा. दं. वि. कलम 143, 269, 270, 188 सह राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005चे कलम 51 (ब), महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37 (3)/ 135, साथीचे रोग अधिनियम 1897चे कलम 2,3,4 तसेच महाराष्ट्र कोविड 19 उपाययोजना नियम 2020चे नियम क्र. 1चे उल्लघंन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी निरीक्षक सुनील जैतापूरकर अधिक तपास करीत आहेत.