Breaking News

तटकरेंनी स्वत:च्या खिशातून किती मदत दिली : नवगणे

श्रीवर्धन : प्रतिनिधी
निसर्ग चक्रीवादळाच्या मदतवाटपावरून महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल नवगणे यांच्यातील वाद सुरूच असून, नुकसान झालेल्या नागरिकांना स्वतःच्या खिशातून किती मदत दिलीत, असा सवाल आता  नवगणे यांनी तटकरेंना केला आहे.
 स्वतःच्या घरात मुलगा आमदार, मुलगी पालकमंत्री आणि स्वतः खासदार आहात. तिघांच्या मानधनातून जनतेला किती मदत केलीत ते दाखवा. स्वतःच्या खिशातून काही काढले नाही. उलट खासदार तटकरे यांनी मोठ-मोठ्या अधिकार्‍यांकडून आपतग्रस्तांना मदतीसाठी पैसे उकळून जनतेला मदत न करता स्वतःचे खिसे भरण्याचे काम केल्याचा आरोप अनिल नवगणे यांनी श्रीवर्धन येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. प्रमोद घोसाळकर, सभापती बाबूराव चोरगे, माजी आमदार तुकाराम सुर्वे हेही सोबत उपस्थित होते.
मुंबई, ठाणे येथील जिल्हाधिकारी कार्यालयातून सेवाभावी संस्थांकडून जमा केलेली मदत श्रीवर्धन, म्हसळा तहसीलदार तसेच उपविभागीय अधिकारी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली होती. ही मदत तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांना हाताशी घेऊन खासदार सुनील तटकरे यांनी आपल्या स्थानिक कार्यकर्त्यांच्या हातात दिली. स्थानिक कार्यकर्त्यांनी या मदतीचे किट ज्यामध्ये अन्नधान्य होते ते फक्त राष्ट्रवादीच्या लोकांनाच वाटप केल्या असल्याचाही आरोप या वेळी नवगणे यांनी केला.
मी 12 वाजता उठतो असे खासदार तटकरे म्हणतात. मी कधी उठतो? काय करतो? याच्या चौकशा करण्यासाठी हे खासदार झालेत का? शेतकर्‍याचा मुलगा कधीच इतका उशिरा उठत नसतो. माझ्या मते मी उठतो त्या वेळी तटकरे महाशय बँकॉक किंवा थायलंडला असतील. ते तिकडे कशाला जातात याचे उत्तर त्यांनाच माहीत, मात्र त्यांचे रात्रीस काय खेळ चालतात? ते कोणता विकास करतात, हे आम्हाला वेळ पडल्यास उघड करावे लागेल, असे इशारावजा वक्तव्य नवगणे यांनी या वेळी केले.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply