पंतप्रधान नरेंद्र मोदींची घोषणा
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील गरिबांना आणखी पाच महिने म्हणजेच 30 नोव्हेंबरपर्यंत धान्य मोफत दिले जाईल, अशी अत्यंत महत्त्वाची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (दि. 30) केली. याचा लाभ देशातील 80 कोटी जनतेला होणार आहे. एवढेच नाही तर संपूर्ण देशात वन नेशन वन रेशन कार्ड योजनाही लवकरच लागू केली जाणार आहे, असेही पंतप्रधान मोदींनी या वेळी जाहीर केले.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, मागील तीन महिन्यांत आपण गरिबांना मोफत अन्नधान्य दिले. पाच किलो गहू किंवा तांदूळ, एक किलो डाळ आणि एक किलो चणे असे धान्य मोफत दिले. अशाच प्रकारे नोव्हेंबरच्या शेवटपर्यंत आपण गरीबांना धान्य मोफत देणार आहोत. पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेतंर्गत 80 कोटी लोकांना मोफत धान्य दिले जाते आहे. ही योजना जुलै ते नोव्हेंबर या काळातही सुरू राहणार आहे. यासाठी 90 हजार कोटींपेक्षा जास्त खर्च होणार आहे. मागील तीन महिन्यांचा खर्च जोडला तर ही रक्कम दीड लाख कोटीच्या घरात जाते.
आज गरीबांना सरकार जर मोफत धान्य देऊ शकत असेल, तर त्याचे श्रेय दोन वर्गांना जाते. एकतर धान्य पिकवणारा शेतकरी आणि दुसरा घटक म्हणजे आपल्या देशाचे इमानदार करदाते. तुमचे परिश्रम आणि प्रयत्न यामुळेच देश गरिबांना ही मदत करू शकतो आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले.
येत्या काळात काळजी घेऊन अर्थव्यवस्थेला पुढे न्यायचे आहे. आत्मनिर्भर भारतसाठी दिवस-रात्र मेहनत करायची आहे. लोकलसाठी व्होकल होऊ, असे आवाहनही त्यांनी या वेळी देशवासीयांना केले.
अनलॉक-1पासून नागरिकांचा बेजाबदारपणा वाढला
कोरोना ही जागतिक साथ आहे. त्याविरोधात लढताना आता आपण अनलॉक-2मध्ये प्रवेश करीत आहोत, पण त्यासोबत आता असा ऋतू आला आहे की ज्या काळात सर्दी, खोकला, ताप अशा प्रकारचे आजार बळावतात. त्यामुळे आपल्याला आता जास्त काळजी घ्यावी लागणार आहे असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, जेव्हापासून अनलॉक-1सुरू झाला तेव्हापासून बेजाबदारपणा वाढला आहे. आता सरकारी अधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्थांना देशातील नागरिकांना नियमांचे पालन करून घ्यावे लागणार आहे. कंटेन्मेंट झोनवर विशेष लक्ष द्यावे लागणार आहे. जे लोक नियमांचे पालन करणार नाही त्यांना टोकावे लागेल, रोखावे लागेल आणि समजून सांगावे लागेल. जगातील इतर देशांच्या तुलनेत भारताने कोरोनाविरुद्ध चांगली लढाई लढली आहे, मात्र अद्यापही संकट टळले नसून मास्कचा वापर, सामाजिक अंतर हे आजही महत्त्वाचे आहे.