नवी मुंबई ः बातमीदार
संपूर्ण देशासह नवी मुंबईतही कोरोनाने थैमान घातले आहे. बालकांपासून ते वयोवृद्धांपर्यंत अनेकांना कोरोनाने ग्रासले. कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने त्याचा सर्वाधिक फटका सर्वसामान्य नागरिकांसह देशाचे भवितव्य असणार्या खेळाडूंनाही बसला आहे. लॉकडाऊनमुळे घराबाहेर पडणे कठीण झाल्याने खेळाडूंना सराव करता येत नाही. परिणामी खेळाडूंतील सरावाची वृत्ती व प्रतिकारशक्ती कमी होत आहे. खेळाडूंना खेळाचा सराव करून त्यांच्यातील प्रतिकारशक्ती कायम राहावी व कोरोनापासून बचावासाठी लॉकडाऊन कालावधीत राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय, राज्य, जिल्हा पातळी स्तरावर खेळणार्या विविध मैदानी खेळातील खेळाडूंना वगळून त्यांना सरावासाठी घराबाहेर पडण्याकरिता परवानगी द्यावी व क्रीडा शिबिरे सुरू करण्याकरिता सहकार्य करावे, अशी मागणी नवी मुंबईतील राष्ट्रीय खेळाडू तथा कराटे क्रीडा प्रशिक्षक शिवाजी ढवळे यांनी राज्याचे क्रीडा व सांस्कृतिक मंत्री त्याचप्रमाणे ठाणे जिल्हाधिकारी, नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त, नवी मुंबई पालिकेचे क्रीडा अधिकारी यांच्याकडे केली आहे. त्याचप्रमाणे लॉकडाऊन कालावधीत खासगी क्रीडा शिक्षकांचे उत्पन्न बंद झाल्याने राज्य शासनाने त्यांना मदत करावी. खेळाडू व क्रीडा प्रशिक्षकांकरिता आर्थिक मानधनाची तरतूद करावी, अशी मागणीदेखील राष्ट्रीय खेळाडू शिवाजी ढवळे यांनी राज्य सरकारकडे केली आहे. लॉकडाऊनमुळे क्रीडांगणे बंद आहेत. कराटे, खो-खो, कबड्डी अशा मैदानी खेळांना व शिबिरांना शासनाने अधिकृतपणे परवानगी दिली नाही. शाळाही बंद असल्याने खेळाडू व मुले घरातच कोंडली गेली. कोरोनाची सद्यस्थिती पाहता आणखी काही महिने क्रीडा क्षेत्रापासून खेळाडू अलिप्त राहण्याची भीती आहे. तसे झाल्यास मुलांच्या शारीरिक विकास व खेळाच्या सरावावरही परिणाम होईल. कोरोनाला रोखण्यासाठी शारीरिक तंदुरुस्ती आवश्यक आहे. त्यासाठी व्यायामशाळा, योगा, मार्शल आर्ट्स वर्गांना शासनाने सशर्त परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात आल्याचे शिवाजी ढवळे यांनी सांगितले.