नवी मुंबई ः प्रतिनिधी
सध्या कोरोना महामारीमुळे संपूर्ण जग अस्वस्थ असताना सिडको प्रशासनाकडून नवी मुंबईमधील गावठाण क्षेत्रातील घरांना तोडक कारवाईच्या नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. अनेक ठिकाणी तोडक कारवाईही सुरू करण्यात आली आहे. सदर कारवाईच्या नोटिसा तत्काळ मागे घेण्यात याव्यात याकरिता बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना साकडे घातले आहे, तसेच सदर नोटिसा मागे न घेतल्यास व तोडक कारवाई सुरू केल्यास सिडको प्रशासनास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
या वेळी आमदार मंदा म्हात्रे यांनी सांगितले की, नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांच्या 100 टक्के जमिनी सिडकोने नवी मुंबई शहर वसविण्यासाठी संपादित केल्या आहेत. ग्रामस्थांनी गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्यासंदर्भात शासन दरबारी प्रश्न प्रलंबित असताना तोडक कारवाई करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. सर्व ठिकाणी कोरोना महामारीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असताना त्यातून अजूनही ग्रामस्थ सावरले नाहीत, परंतु सिडको प्रशासन ग्रामस्थांना मदत करण्याऐवजी त्यांच्या घरांवर तोडक कारवाई करून त्यांना बेघर करावयास निघाले आहे.
तसेच नियमानुसार पावसाळ्यामध्ये कोणत्याही घरांवर कारवाई करता येत नाही. असे असताना सिडकोकडून ज्या ग्रामस्थांच्या जमिनी संपादित केल्या त्या ग्रामस्थांना घरांच्या तोडक कारवाईच्या नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. सिडकोने ग्रामस्थांना देण्यात आलेल्या नोटिसा मागे न घेतल्यास सिडको प्रशासनाविरोधात आंदोलन करण्यात येईल. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले असून सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनाही यासंदर्भातील पत्र दिल्याचे आमदार मंदा म्हात्रे यांनी सांगितले.