Breaking News

सोने दरवाढ दिलासादायक

कोरोनाच्या या भीषण संकटकाळात सतत कानावर आर्थिक मंदीचीच चर्चा येत होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या सातत्याने वाढत चाललेल्या किंमतींनी भारतीयांचे चेहरे उजळले आहेत. गंमत म्हणजे कोरोनामुळे निर्माण झालेली पराकोटीची अनिश्चितता हेच सोन्याच्या या किंमत वाढीचे प्रमुख कारण आहे. जोवर कोरोनाला अटकाव करणारी लस बाजारात येत नाही तोवर अवघी अनिश्चितता कायम राहणार व परिणामस्वरुपी या वर्षअखेरीपर्यंत तरी सोन्याचे दर असेच वाढत राहणार असे जगभरातील अर्थतज्ज्ञ सांगत आहेत.

कोरोनाच्या या संकट काळात एखादी आनंददायी बातमी दुर्मिळच. अशावेळी गेल्या काही दिवसांत सोन्याच्या चढ्या भावांनी मात्र मध्यमवर्गीयांचे चेहरे उजळले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची मागणी वाढल्याने सोन्याच्या किंमतीने नवीन उच्चांक नोंदवला आहे. आणि जागतिक घडामोडींपाठोपाठ भारतातही सोन्याचे दर वाढून सोन्याने 50 हजारांचा टप्पा पार केला आहे. कोरोना महामारीच्या या काळात आपण सतत जागतिक मंदीबद्दलचीच चर्चा ऐकत असताना अचानक सोन्याच्या किंमती वधारल्याच्या या बातम्या का बरे येऊ लागल्या आणि सोन्याच्या किंमती आणखी किती काळ अशाच वाढत राहणार हे पाहणे उत्कंठावर्धक ठरेल. भारतात बुधवारी तब्बल नऊ वर्षांनी सोन्याने एका तोळ्याला 50 हजार रुपये हा टप्पा गाठला. सर्वसामान्यांना ऐकून कदाचित आश्चर्य वाटेल की कोरोना महामारीमुळे निर्माण झालेली अनिश्चितता हे सोन्याच्या दरवाढीमाचे प्रमुख कारण आहे. अन्य कारणे ही या अनिश्चिततेतूनच जन्मलेली आहेत. कोरोना महामारी आजही जगात थैमान घालते आहे. हे सारे कधी संपणार हे आताच्या घडीला कुणीही नेमकेपणाने सांगू शकत नाही. कोरोनाचा अटकाव भविष्यात येणार्‍या लशीवर आणि औषधांवर अवलंबून आहे आणि यशस्वी लस नेमकी कधी बाजारात येणार हेही आताच्या घडीला तरी कोणी सांगू शकत नाही. एकंदर अनिश्चित परिस्थितीमुळे तसेच कोरोनाच्या थैमानाने बहुतेक उद्योग क्षेत्रांची कामगिरी मंदावल्याने अमेरिकी डॉलर घसरला आहे. तेथील बँकांनी व्याजदर आत्यंतिक कमी केले आहेत. तसेच सरकारकडून येत्या काळातही अनेक मदत योजना जाहीर होणार असल्याने सरकारी तिजोरीवरील ताण वाढतच राहणार हेही उघडच आहे. अडचणीच्या काळात सोनेच उपयोगी पडते ही मानसिकता निव्वळ भारतीयांची नसून जगभरातील गुंतवणूकदारांची आहे. येणार्‍या काळात अडचणी आणखी वाढतील या भितीने गुंतवणूकदार सोने खरेदी करत सुटल्याने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याची मागणी वाढून त्या परिणाम सोन्याचे दर वाढण्यावर झाला आहे. भारतातील सोन्याच्या किंमती या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर अवलंबून असतात कारण आपण सोने आयात करतो. आपल्याकडे सोने फारसे निर्माण होत नाही. मात्र चीन पाठोपाठ भारत हा जगभरातील सोन्याचा दुसर्‍या क्रमांकाचा ग्राहक आहे. आपल्याकडील सोन्याचे खरेदीदार मात्र सोन्याकडे गुंतवणूक म्हणून न पाहता लग्न व सण समारंभांच्या निमित्ताने करावयाची दागिन्यांची खरेदी या स्वरुपात पाहतात. त्यामुळेच हे सोने बहुतांशी घरच्या तिजोरीत बंदिस्तच राहते. याबद्दल आपल्याकडचे अर्थतज्ज्ञ वेळोवेळी चिंताही व्यक्त करीत आले आहेत. परंतु ते काहीही असले तरी सोन्याचे दर वाढणे ही भारतीयांसाठी आनंदवार्ताच आहे आणि येत्या वर्ष-दीड वर्षांच्या काळात सोन्याच्या किंमती वाढतच राहतील. किमान प्रभावी लस बाजारात येईपर्यंत तरी सोने असे झळाळत राहील असा अंदाज जगभरातील गुंतवणूक तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत ही कोरोनाच्या या संकटकाळात भारतीयांसाठी मोठी आनंदवार्ताच आहे.

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply