पनवेल : प्रतिनिधी
कोविड-19 सर्वत्र पसरलेला असल्यामुळे आणि परिणामी लॉकडाऊन मध्ये पथविक्रेत्यांच्या उपजिविकेवर विपरित परिणाम केला आहे. पथ विक्रेते कमी भांडवलावर धंदा करतात. या लॉकडाऊनमध्ये भांडवल त्यांच्याकडे शिल्लक असलेले भांडवल संपले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे पथविक्रेत्यांना त्यांचा व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी आत्मनिर्भर होण्यासाठी केंद्र शासनाच्या पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पनवेल महापालिकाआयुक्त सुधाकर देशमुख यांनी केले आहे.
पथविक्रेते अनौपचारिक नागरी अर्थव्यवस्थेचा अत्यंत महत्वाचा घटक आहेत. ते नागरिकांच्या आर्थिक कुवतीप्रमाणे स्वस्त दरात वस्तू व सेवांची उपलब्धता सुनिश्चित करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. त्यांच्याद्वारे पुरवल्या जाणार्या वस्तूंमध्ये उदा. भाज्या, फळे, तयार खाद्यपदार्थ, चहा, भजी, पाव, अंडी, कापड, वस्त्र, चप्पल, कारागीराद्वारे उत्पादित वस्तू, पुस्तके, स्टेशनरी इत्यादींचा समावेश होतो. तर सेवेमध्ये उदा. केशकर्तन दुकाने, चर्मकार, पान दुकाने, कपडे धुण्याची दुकाने इत्यादींचा समावेश होतो. कोविड -19 सर्वत्र पसरलेला असल्यामुळे आणि परिणामी लॉकडाऊन मध्ये पथविक्रेत्यांच्या उपजिविकेवर विपरित परिणाम केला आहे. त्यामुळे पथविक्रेत्यांना त्यांचा व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी खेळते भांडवलाचा पतपुरवठा तातडीने करण्याची आवश्यकता असल्याची जाणिव शासनाला आहे.
पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील पथविक्रेत्यांना त्यांचा व्यवसाय पुन्हा उभा करण्यासाठी योजना राबविण्याबाबत केंद्र व राज्य शासनाने दिलेल्या सूचनांनुसार राज्यात महानगरपालिका व नगरपालिकेत केंद्र शासन पुरस्कृत पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी-पथविक्रेत्यांसाठी विशेष सुक्ष्म पतपुरवठा सुविधा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणीसाठी पुढील संकेतस्थळावर इच्छुकांनी निधी प्राप्त करण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन आयुक्त, पनवेल महानगरपालिका यांनी केले आहे. त्यासाठी खालील संकेतस्थळावर इच्छुकांनी निधी प्राप्त करण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. पथविक्रेता कर्ज करण्यासाठी अर्ज पद्धत- http://pmsvanidhi.mohua.gov.in या वेबसाईट द्वारे अर्ज करणे. CSC केंद्र, ALF, CLF, तसेच CLC यांच्याद्वारे अर्ज करू शकतात, यासाठी रु. 50/- शुल्क आहे. आधार कार्ड व आधार कार्ड संलग्न मोबाइल क्रमांक असणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी पनवेल महानगरपालिकेच्या राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानचे प्रमुख नवनाथ थोरात यांच्या 98507 25584 या मोबाइलवर संपर्क करू शकता.