Breaking News

अलिबाग एसटी आगारातील 31 कर्मचारी निलंबित

अलिबाग : प्रतिनिधी
अलिबाग ते दादर बसवर ड्युटी करण्यास नकार दिल्याने अलिबाग एसटी आगारातील 31 कर्मचार्‍यांना निलंबित करण्यात आले. यामुळे कर्मचार्‍यांमध्ये नाराजी पसरली आहे.
कोरोनामुळे राज्य परिवहन महामंडळाची जिल्हा अंतर्गत सेवा सुरू आहे. आंतरजिल्हा प्रवासी वाहतूक बंद आहे. सध्या अलिबाग ते पनवेल अशी सेवा सुरू आहे. असे असताना रायगड विभाग नियंत्रकानी 28 ऑगस्टला अलिबाग एसटी आगारातील कर्मचार्‍यांना पनवेल-दादर-अलिबाग दादर अशा ड्युटी लावल्या होत्या. याबाबत कर्मचार्‍यांना व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातूनही सांगण्यात आले होते, तर कार्यालयातही ड्युटीबाबत बोर्डावर सूचना केल्या होत्या, मात्र चालक व वाहकांनी ही ड्युटी करण्यास नकार दिला. त्यामुळे रायगड विभाग वाहतूक नियंत्रकानी 31 कर्मचार्‍यावर निलंबनाची कारवाई केली.
कोरोना काळात जिल्ह्यातंर्गत वाहतूक करण्याचे आदेश असतानाही आंतरजिल्हा ड्युटी लावली जात आहे. जिल्हा अंतर्गत ड्युटी करण्यास आमची तयारी आहे. अलिबाग ते दादर बससेवा सुरू करण्याबाबत शासनाचे कोणतेही लेखी आदेश नाहीत. ज्या ड्युटी लावण्यात आल्या आहेत त्या चुकीच्या आहेत. ही सेवा सुरू करण्याबाबत सुधारित लेखी आदेश द्यावेत. कर्मचार्‍यांचे निलंबन मागे घ्यावे, अशी आमची मागणी असल्याचे एसटी कामगार सेनेचे प्रसन्ना पाटील यांनी सांगितले.

Check Also

‘नैना’साठी शेतकर्‍यांच्या घरांवर कोणतीही तोडक कारवाई करू नका

आमदार महेश बालदी यांची हिवाळी अधिवेशनात मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तिसर्‍या मुंबईच्या अनुषंगाने नैना …

Leave a Reply