विजय हजारे करंडक स्पर्धेत विक्रमी द्विशतक
जयपूर : वृत्तसंस्था
ऑस्ट्रेलिया दौर्यातील सुमार कामगिरीमुळे युवा मुंबईतर फलंदाज पृथ्वी शॉ याला भारतीय संघातून डच्चू देण्यात आला होता, मात्र भारतीय संघातील स्थान गमावल्यानंतर आता विजय हजारे करंडक स्पर्धेत मुंबईकडून खेळताना पृथ्वीने जबरदस्त फलंदाजी करत विक्रमी कामगिरी केली आहे. मुंबईचे नेतृत्व करणार्या पृथ्वीने पुद्दुचेरीविरुद्धच्या लढतीत तुफानी द्विशतकी खेळी करताना 152 चेंडूंत नाबाद 227 धावा फटकावल्या.
पृथ्वी शॉने केलेली नाबाद 227 धावांची खेळी ही प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये कुठल्याही कर्णधाराने केलेली सर्वांत मोठी खेळी ठरली आहे. ही खेळी करताना त्याने दक्षिण आफ्रिकेचे ग्रीम पोलॉक (नाबाद 222), भारताचा वीरेंद्र सेहवाग (219) आणि रोहित शर्मा (208) यांनी कर्णधार म्हणून केलेल्या मोठ्या खेळीचा विक्रम मोडीत काढला.
विजय हजार करंडक स्पर्धेत मुंबईविरुद्धच्या सामन्यात पुद्दुचेरीने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारल्यावर मुंबईकडून सलामीला उतरलेल्या पृथ्वी शॉ याने तुफानी फलंदाजीचे प्रदर्शन केले. यशस्वी जयस्वालच्या (10 धावा) रूपात मुंबईला सातव्या षटकात मोठा धक्का बसला. त्यानंतर पृथ्वीने आदित्य तरेसोबत (56 धावा) मिळून 153 धावांची भागीदारी केली. तरे बाद झाल्यानंतर पृथ्वीने सूर्यकुमार यादवसोबत पुद्दुचेरीच्या गोलंदाजांची धुलाई सुरू ठेवली. यादरम्यान, सूर्यकुमारने आपले शतक, तर पृथ्वीने आपले द्विशतक पूर्ण केले. सूर्यकुमार 58 चेंडूंत 133 धावा तडकावून बाद झाला, मात्र तत्पूर्वी सूर्यकुमार आणि पृथ्वीने 201 धावांची भागीदारी करीत मुंबईला चारशे धावांचा टप्पा ओलांडून दिला. मुंबईने निर्धारीत 50 षटकांत 4 बाद 457 धावा फटकावल्या.