पेण ः प्रतिनिधी
वडखळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाशी गावाजवळ मोटरसायकल व कारची धडक होऊन या अपघातात तीन जण जखमी झाले आहेत. रविवारी (दि. 2) सायंकाळी 6.45 वाजेच्या सुमारास मोटरसायकलस्वार आपल्या मागे एका इसमास बसवून वाशी फाट्याकडून वाशी गावाकडे जात असताना हा अपघात घडला.
या वेळी मौजे वाशी गावच्या हद्दीत वाशी सरकारी दवाखान्याच्या अलीकडील रस्त्यावर पेण येथे आला असता भरधाव वेगात मोटरसायकल चालवून दुचाकीस्वाराने वाशी गावाकडून येणार्या कारला
(एमएच 06 बीयू 7275) राँग साइटने समोरून ठोकर मारली. या अपघातात मोटरसायकलस्वार तसेच मागे बसलेला इसम व कारमधील आरती म्हात्रे (रा. डोलवी) यांना दुखापत झाली. दोन्ही वाहनांचेही नुकसान झाले. याबाबत वडखळ पोलीस ठाणे येथे गु. र. नं. 57/2020 भा. दं. वि. क. 279, 337, 338, मोटर वाहन अधिनियम 1988चे कलम 184प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक फौजदार एन. आर. पाटील करीत आहेत.
अपघातात दुचाकीस्वार ठार
पेण ः मुंबई-गोवा महामार्गावरील पेणनजीक भरधाव ट्रेलरने दुचाकीला धडक दिल्याने अपघात घडला. या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. चालक (रा. नवघर ता. उरण) आपल्या ताब्यातील ट्रेलर (एमएच 46/बीएफ 6206) ओव्हरटेक करताना ट्रेलरच्या उजव्या बाजूच्या साइड लाइटचा धक्का लागून मोटरसायकलस्वार रस्त्यावर पडला. या वेळी ट्रेलरच्या पाठीमागील चाकाखाली येऊन मोटरसायकलस्वाराच्या डोक्यास व अन्य ठिकाणी गंभीर स्वरूपाच्या जखमा होऊन त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूस व वाहनांच्या नुकसानीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.