कर्जत : बातमीदार – कर्जत तालुक्यातील वदप ग्रामपंचायत हद्दीत दुर्गम भागात असलेल्या कळकराई ग्रामस्थांची मावळ आणि कर्जत तालुक्याला जोडणारी बैलगाडीची वाट पावसामुळे खचली आहे. त्यामुळे ग्रामस्थांना गावातून खाली येणे कठीण होऊन बसले आहे.
कळकराई हे कर्जत तालुक्यातील पुणे जिल्हा हद्दीवर असलेले गाव असून, जेमतेम 40 घरांची येथे वस्ती आहे, मात्र या गावात पोहचायला रस्ता नाही. वदप डोंगरावर असलेल्या ढाक गावातून आणि मूळगाव माणगाव येथून गावात जाण्यासाठी पायवाट आहे. ढाक गाव कळकराईच्या कक्षेत असून, ही दोन्ही गावे सह्याद्री डोंगरात वसली आहेत. रस्त्यापासून दूर असलेल्या या दोन्ही गावांतील लोकांचा दररोजचा प्रवास पायीच असतो. त्यामुळे ढाक ग्रामस्थांनी गाव सोडून पायथ्याला घरे बांधून स्थलांतर केले आहे, परंतु कळकराईमध्ये आजही मोठ्या प्रमाणात लोक राहून आहेत. त्याचे कारण म्हणजे जेमतेम तासाभरात ते नळीच्या वाटेने मावळ तालुक्यात पोहचतात. वर्षानुवर्षे याच नळीच्या वाटेने उन्हाळ्यात बैलगाडीने आणि पावसाळ्यात पायी प्रवास सुरू असतो.
सध्या पावसाचे प्रमाण वाढल्याने कळकराई भागातील पायवाट निसरडी झाली होती. अशातच मावळ आणि कर्जत तालुका यांना जोडणारी नळीची वाट दरड कोसळून वाहून गेली आहे. दरडीसोबत माती आणि दगड वाहून गेल्याने रस्ता खचला आहे. त्यात स्थानिक लोक वाट काढून येऊ शकतात, पण बाहेरून ट्रेकिंगसाठी येणार्यांनी या वाटेने येऊ नये, असे आवाहन कळकराई ग्रामस्थांनी केले आहे.