नवी मुंबई : रामप्रहर वृत्त
दिवाळीनंतर कोरोना रुग्णांत वाढ झाल्याने 352 दिवसांवर गेलेला रुग्णदुपटीचा कालावधी कमी झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून बाधितांची संख्या कमी झाली आहे. या आठवड्यात रुग्णसंख्या 50च्या जवळपास आलेली पाहायला मिळाली. दिवाळीपूर्वी शहरात कोरोना रुग्णदुपटीचा कालावधी हा 11 नोव्हेंबर रोजी 352 दिवसांवर गेला होता. त्यानंतर काही नागरिकांनी बेफिकिरी करीत दिवाळीच्या खरेदीसाठी मोठ्या संख्येने घराबाहेर पडले. या वेळी नियमांचे पालन केले नाही. त्यामुळे कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाली. दिवाळीपूर्वी शंभरच्या खाली आलेली कोरोनाबाधितांची संख्या परत 200च्या घरात पोहचली. भाऊबीजेच्या दिवशी शहरात 61 नवे कोरोनाबाधित आढळले होते. ही या काळातील सर्वात कमी रुग्णांची नोंद झाली होती. मात्र त्यानंतर रुग्णसंख्या दुपटीने वाढत गेली होती. त्यामुळे 352 दिवसांवर गेलेला रुग्णदुपटीचा कालावधी कमी होत 265 दिवसांवर आला होता. आता पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे नवी मुंबईकरांसाठी ही नक्कीच दिलासादायक बाब आहे. या आठवड्यात रुग्णसंख्या 50च्या जवळपास आलेली पाहायला मिळत आहे. त्यामुळे रुग्णदुपटीचा कालावधी हा दीड वर्षांपेक्षा अधिक दिवसावर गेला आहे, ही शहरासाठी चांगली बातमी आहे. नागरिकांनी कोरोनाचे नियम पाळणे अत्यंत आवश्यक असल्याचे पाालिका प्रशासनाने सांगितले आहे. तसेच कोरोना झाल्यानंतर आता रुग्ण काळजी केंद्रात जाण्यापेक्षा गृह अलगीकरणात राहण्यास पसंती देत आहेत. त्यामुळे 923 रुग्णांपैकी निम्म्यापेक्षा जास्त रुग्ण हे गृह अलगीकरणात असल्याचे पालिका प्रशासनाने सांगितले.
13 पैकी 12 कोविड केअर सेंटर बंद
शहरात 13 कोरोना काळजी केंद्रांसह पालिकेच्या वाशी येथील रुग्णालयात व नेरुळ येथील डॉ. डी. वाय पाटील रुग्णालयात अत्यवस्थ रुग्णांवर उपचार करण्यात येत होते. नवी मुंबई शहरात कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात येत असल्याने रुग्णसंख्येत घट होत आहे. त्यामुळे आता वाशी येथील पालिकेचे रुग्णालय सामान्य रुग्णालय करण्यात आले असून 13 पैकी 12 कोरोना काळजी केंद्रे बंद करण्यात आली आहेत.