Breaking News

महाडच्या शासकीय रुग्णालयातील कोविड सेंटर हलविण्यास भाजपचा विरोध

महाड : प्रतिनिधी – महाड तालुक्यातील गरीब आणि गरजू रुग्णांसाठीचे महाड येथील शासकीय रुग्णालयातील कोविड सेंटर एमआयडीसीमध्ये स्थलांतरित करण्यात येत आहे. या निर्णयाला महाड भाजपने कडाडून विरोध केला आहे. या संदर्भात उपविभागीय अधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले आहे. आमचा एमआयडीसीमधील कोविड सेंटरला विरोध नसून नाते, दासगाव, खाडीपट्टा, विन्हेरे विभाग आणि महाड शहरासाठी शासकीय रुग्णालयातील कोविड सेंटर अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे महाड शासकीय रुग्णालयातील कोविड सेंटर इतरत्र हलवू नये, अशी मागणी भाजपने केली आहे.

महाडमध्ये कोरोनाचा प्रार्दुभाव मेनंतर झपाट्याने वाढू लागला. त्या वेळी महाडमधील रुग्णांना पुढील उपचारासाठी माणगाव, अलिबाग मुंबई अथवा पुणे येथे जावे लागत होते, मात्र गोरगरीबांना मुंबई-पुण्यात जाणे परवडत नसल्याने वैद्यकीय अधीक्षक डॉ. भास्कर जगताप, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बिराजदार आणि त्यांच्या सहकारी कर्मचार्‍यांनी महाड ट्रामा केअर सेंटरमधील शासकीय रुग्णालयात 20 खाटांचे कोविड सेंटर सुरू केले. विषेश म्हणजे पुणे, मुंबईत कोरोना रुग्णांचे होणारे मृत्यू आणि महाड कोविड सेंटरमध्ये रुग्णांवर होणारे यशस्वी उपचार यामुळे या सेंटरला लोकांनी सर्वाधिक पसंती दिली होती. डॉ. जगताप यांनी सामाजिक संस्थांकडून या सेंटरसाठी व्हेंटिलेटर, ऑक्सिजन व इतर साहित्य मिळवून सेंटर अधिकच सुसज्ज केले.

कोरोना रुग्णांनचे वाढते प्रमाण पाहता जिल्हाधिकारी निधी चौधरी, महाड उत्पादन संघटना आणि देवाड्रील कंपनी यांच्या सहकार्याने महाड एमआयडीसीत केएसफ कॉलनीत 200 खाटांचे कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे, मात्र या सेंटरसाठी शासनाकडून तज्ञ डॉक्टर उपलब्ध झाले नसल्याने महाड कोविड सेंटर व तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राची सर्व पथके एमआयडीसीत नेण्याचा प्रयत्न आहे. असे केल्याने ऐन गणेशोत्सवामध्ये ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा कोलमडणार आहे. ते पाहता महाड शासकीय रुग्णालयातील कोविड सेंटर न हलवता एमआयडीसीत कोविड सेंटरसाठी शासनाने नव्याने डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी नेमावेत, अशी मागणी महाड भाजपच्या वतीने जिल्हा सरचिटणीस बिपीन महामुणकर, तालुकाध्यक्ष जयवंत दळवी, मीडिया संपर्कप्रमुख महेश शिंदे, उपतालुकाध्यक्ष चंद्रजित पालांडे, शहर चिटणीस संजयअप्पा सोंडकर, नाते विभाग अध्यक्ष सुहास कुडपाने यांनी उपविभागीय अधिकारी विठ्ठल इनामदार यांना निवेदन देऊन केली आहे.

दरम्यान, महाड शासकीय रुग्णालयातील कोविड सेंटर बंद केले जाणार नाही, असे आश्वासन उपविभागीय अधिकारी विठ्ठल इनामदार यांनी दिले असून, नवीन कोविड सेंटरमुळे महाडच्या ग्रामीण आरोग्य यंत्रणेवर कोणताही परिणाम होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

महाड ट्रामा केअर सेंटरच्या टेरेसवर 50 खाटांचे कोविड सेंटर उभारावे, अशी मागणी भाजपच्या वतीने या वेळी करण्यात आली. यासाठी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्याकडून निधी उपलब्ध करून देऊ, असा विश्वास बिपीन महामुणकर यांनी व्यक्त केला.

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply