Breaking News

कसोटीसाठी भारतीय संघात टी. नटराजनचा समावेश

मेलबर्न ः वृत्तसंस्था
ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार्‍या तिसर्‍या आणि चौथ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात टी. नटराजनचा समावेश करण्यात आला आहे. दुसर्‍या कसोटी सामन्यात भारताचा जलद गोलंदाज उमेश यादवला दुखापत झाली होती. तो पुढील दोन्ही सामने खेळणार नसल्याचे संघ व्यवस्थापनाने जाहीर केले होते. तेव्हापासून यादवच्या जागी कोणत्या खेळाडूला संधी मिळणार याची चर्चा सुरू होती. जलद गोलंदाज म्हणून टी. नटराजन आणि शार्दुल ठाकूर या दोघांचे नाव आघाडीवर होते.
बॉक्सिंग डे कसोटीत उमेश यादवला दुखापत झाली होती. त्यामुळे तो उर्वरित कसोटी मालिकेला मुकणार आहे. ऑस्ट्रेलिया दौर्‍यातील कसोटी मालिका सुरू झाल्यानंतर भारतीय संघाला बसलेला हा दुसरा मोठा झटका आहे. त्याआधी पहिल्या कसोटी सामन्यात मोहम्मद शमीला दुखापत झाली होती. त्यामुळे तो संघाबाहेर झाला. उमेश यादव आणि मोहम्मद शमी हे दोन्ही खेळाडू बेंगळुरू येतील राष्ट्रीय क्रिकेट अकादमी येथे फिटनेसवर काम करणार आहेत, असे बीसीसीआयने म्हटले आहे.
टी. नटराजनने आयपीएलमध्ये धमाकेदार कामगिरी केली होती. त्यामुळेच ऑस्ट्रेलिया दौर्‍यात वन डे मालिकेतील तिसर्‍या लढतीत त्याला पदार्पणाची संधी मिळाली. त्यानंतरच्या टी-20 मालिकेतदेखील त्याने शानदार गोलंदाजी केली होती. भारतीय संघाने वन डे मालिकेतील पहिल्या दोन लढती गमावल्या होत्या. अखेरच्या लढतीत नवदीप सैनीला दुखापत झाल्याने नटराजनला संघात जागा मिळाली. त्याने मार्नस लाबुशेनची विकेट घेत दमदार पदार्पण केले. पहिल्या सामन्यात त्याने दोन विकेट्स घेतल्या. नंतर टी-20 मालिकेत तीन लढतीत त्याने सर्वाधिक सहा विकेट्स घेत सर्वांचे लक्ष वेधले. आता उमेश यादवच्या दुखापतीमुळे संघात स्थान मिळवणार्‍या टी. नटराजनला अंतिम 11 जणांमध्ये खेळण्याची संधी मिळते का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply