अलिबाग : प्रतिनिधी
पाच दिवसांनतर पाऊस थांबल्यामुळे रायगड जिल्ह्यात शेतीच्या कामांना वेग आला आहे. लावणीच्या कामांनाही सुरूवात झाली आहे. धरणक्षेत्रात चांगला पाऊस झाल्यामुळे जलाशायांमध्ये 50 टक्के पाणीसाठा झाला आहे.
जून महिन्याच्या सुरूवातीला मान्सूनपूर्व सरी कोसळल्या होत्या. त्यामुळे धूळपेरणी केलेली भाताची रोपे तयार झाली होती. त्यानंतर मात्र पावसाने दडी मारली. भात रोपे पिवळी पडू लागली होती. त्यामुळे शेतकरी चिंतातूर होता. जून महिन्याच्या शेवटच्या आठवडयात मात्र पावसाने दमदार पुनरागमन केले. सलग पाच दिवस झालेल्या या पावसाने आपली सुरूवातीची कसर भरून काढली.
बुधवारपासून मात्र पावसाने विश्रांती घेतली आहे. रायगडकरांना पाच दिवसांनंतर सूर्यदर्शन घडले. पावसामुळे सर्वत्र पाणीपाणी झाले आहे. शेतांमध्ये पाणीसाठा झाल्याने शेतकरी सुखावला आहे. शेतीच्या नांगरणीच्या कामाला वेग आला आहे. रोपे उगवून चांगली वर आल्याने काही ठिकाणी लावणीच्या कामालादेखील सुरूवात झाली आहे. पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने धरणांमध्येही पाणीसाठा झाला आहे. जिल्ह्यात दोन मध्यम तर 39 लघुपाटबंधारे आहेत. 36पाझर तलाव आहेत. चांगल्या पावसामुळे 50 टक्के पाणीसाठा झाला आहे.