सुवासिनींनी घेतला ओवसा
कर्जत ः प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यात गौरी-गणपती सणाला फार महत्त्व आहे. या सणाला कुठेही असलेला माणूस आपल्या घरी येतो. गणरायाच्या प्राणप्रतिष्ठेनंतर दोन-तीन दिवसांनी गौरीचे आगमन होते. काही ठिकाणी फुलांच्या तर काही ठिकाणी मूर्तीच्या गौरींचे पूजन करण्यात येते. त्यानंतर घरातील व शेजारील सुवासिनी गौरीचा ओवसा घेतात. यंदा कोरोनाच्या सावटाखाली हा सोहळा पार पडला. यंदा कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीत 1345, नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत 1252, तर माथेरान पोलीस ठाण्याच्या हद्दीत 11 अशा 2608 गौरींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.
गणेश चतुर्थीला गणेशाची प्राणप्रतिष्ठा करण्यात येते. कुणी दीड दिवसाने, कुणी पाच दिवसांनी, कुणी गौरींबरोबर, कुणी वामन नवमी, तर कुणी अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश विसर्जन करतात, मात्र गौरींचे आगमन एकाच वेळी होते. कुणी मूर्तीची गौर पूजतात, तर कुणी आदल्या दिवशी पहाटेच रानात जाऊन गौरी पूजनाच्या पूर्वसंध्येपर्यंत कचोर्याची फुले (गौरीची फुले) व तेरड्याच्या फुलांसकटच्या फांद्या आणतात. त्यानंतर महिला रात्रभर गाणी गात गौर सजवण्यात गुंततात. साडी नेसवून गौर सजवून त्यावर मुखवटा आणि पुठ्ठ्याचे हात लावून खुर्चीवर गौर बसवितात. कुणाच्या उभ्या, तर कुणाच्या नाचर्या गौरी असतात.