Breaking News

सिंधुदुर्गातील विद्यार्थिनीला पंतप्रधानांचा मदतीचा हात

मुंबई ः प्रतिनिधी
इंटरनेट कनेक्शन व पुरेशा सुविधा नसल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुलीला ऑनलाइन लेक्चर्सच्या माध्यमातून शिक्षणास अडचणी येत होत्या. या संदर्भातील फोटो व्हायरल झाल्यानंतर थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मुलीची मदत केली आहे.
 सिंधुदुर्गमधील दारिस्ते गावातील स्वप्नाली सुतार या मुलीचा फोटो काही दिवसांपासून व्हायरल होत होता. यात ही मुलगी एका छोट्या शेडवजा झोपडीत बसून अभ्यास करताना दिसत होती. या संदर्भातील बातम्या समोर आल्यानंतर पंतप्रधान कार्यालयाने तिला मदत करण्यासंदर्भातील सूचना संबंधित यंत्रणांना केल्या. त्यानुसार या मुलीस इंटरनेट कनेक्शनपासून लॅपटॉपर्यंत सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. या संदर्भातील फोटो भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष विजया राहटकर यांनीही ट्विटरवरून शेअर केला आहे.
स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात पंतप्रधानांनी पुढील हजार दिवसांत देशातील प्रत्येक गावात ऑप्टीकल फायबर पोहचवण्याचे काम केले जाईल, असे म्हटले होते, मात्र खरोखरंच आपल्या गावात इंटरनेटची सुविधा उपलब्ध होऊन थेट पंतप्रधानांकडून मदत मिळेल असा विचारही स्वप्नालीने केला नसेल. लॉकडाऊनमुळे गावातच अडकल्याने मुंबई विद्यापीठामार्फत घेण्यात येणार्‍या ऑनलाइन लेक्चर्सला उपस्थिती लावण्यात स्वप्नालीला तांत्रिक अडचणी येत होत्या. छोट्या शेडमध्ये बसून स्वप्नाली ऑनलाइन लेक्चरला उपस्थित राहायची.
स्थानिक तसेच राष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी स्वप्नालीच्या जिद्धीची कथा समोर आणली व याची दखल थेट पंतप्रधान कार्यालयाने घेतली. एका आठवड्यातच भारत सरकारच्या माहिती तंत्रज्ञान व भारत नेट खात्यामधील अधिकारी स्वप्नालीच्या गावी पोहचले. त्यांनी थेट ग्रामपंचायतीपासून स्वप्नालीच्या घरापर्यंत इंटरनेटचे कनेक्शन दिले. स्वप्नालीने तिची संघर्ष कथा मांडणार्‍या प्रसारमाध्यमांबरोबरच सरकारी यंत्रणांचेही आभार मानले आहेत.

Check Also

50 टक्के सवलतीच्या दरात एलईडी टीव्ही आणि रेंजर सायकल

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते उपक्रमाचा शुभारंभ पनवेल : रामप्रहर वृत्तमाजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर …

Leave a Reply