मुंबई : प्रतिनिधी
टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चने (टीआयएफआर) एक महत्त्वपूर्ण अहवाल मुंबई महापालिकेकडे सोपवला आहे. त्यानुसार 1 नोव्हेंबरपर्यंत मुंबईतील सर्व कार्यालयांसह वाहतूक सुविधा पूर्णपणे सुरळीत करता
येऊ शकेल, असे सांगण्यात आले आहे.
याचबरोबर स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी अॅण्ड कॉम्प्युटर सायन्सचे संचालक संदीप जुनेजा यांनी अहवाल सादर करीत शाळा जानेवारी 2021पासून सुरू करण्याची शिफारस केली आहे. टीआयएफआरच्या टीमने सांगितले की, सप्टेंबर महिन्यात शहरातील अनलॉक 30 टक्क्यांपर्यंत वाढविले गेले पाहिजे. ज्यामध्ये कार्यालयांमधील उपस्थिती व वाहतूक व्यवस्थेचादेखील समावेश असेल, तर ऑक्टोबरपर्यंत हे प्रमाण 50 टक्क्यांपर्यंत वाढले पाहिजे. शहरातील सर्व व्यवहार टप्प्याटप्प्याने व पूर्ण क्षमतेने 1 नोव्हेंबरपर्यंत सुरळीत व्हायला हवेत, मात्र हे सर्व करताना कोरोना संसर्ग टाळण्यासाठी ठरवण्यात आलेल्या सर्व नियमांचे जसे की, सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर, सॅनिटायझेशन, निर्जंतुकीकरण व स्वच्छता इत्यादींचे काटेकोर पालन व्हायला हवे, असेही सुचविण्यात आले आहे.