Breaking News

पुरोगामी महाराष्ट्रात एसटीलाही अंधश्रद्धेचे ग्रहण

पुरोगामी विचारसरणीची परंपरा असलेल्या महाराष्ट्र राज्यात जनतेला अंधश्रद्धा निर्मूलनाचे धडे देणारेच सरकार आणि प्रशासनच जेव्हा स्वत:च या अंधश्रद्धेच्या विळख्यात गुरफटून जाते, तेव्हा मग जनतेने कोणाचा आदर्श घ्यावा असा प्रश्न पडतो. एसटीच्या देवगड आगारात नव्याने रुजू झालेल्या शयन बसला काळी बाहुली लटकविण्याचा धक्कादायक प्रकार पाहिल्याने प्रशासन आणि सरकारच्या या वागण्याचा राग आल्याशिवाय राहत नाही.

महाराष्ट्राचे महाआघाडीचे सरकार स्थापन झाले आणि मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरील एका मंत्रालयाचे दालन अपशकुनी आहे म्हणून ते घेण्यास पुरोगामी महाराष्ट्रातील स्वत:ला पुरोगामी म्हणविणारे नेते धजावत नव्हते. आज शाहू फुले आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात सरकारच प्रतिनिधीत्व करणारे पुढारी, सरकारी कर्मचारी, आणि समाजाला दिशा देणारे शिक्षक अंधश्रद्धेच्या विळख्यात अडकले आहेत. शासकीय कार्यालयातील पूजाअर्चा, देवीदेवतांचे फोटो हे याच बुरसटलेल्या विचारसरणीचे प्रतिक आहे. आज शाळा महाविद्यालयात शास्त्राचे धडे जरी गिरवले जात असले तरी शास्त्राचे निकश लावून घटनांची उकल करणारे तरुण दिसत नाहीत. ही चूक या तरुणांची नसून अंधश्रद्धेच्या बुरख्यातून बाहेर न पडणार्‍या समाजाची आहे. अनन्वित अत्याचार आणि अवहेलना सोसून थोर समाज सुधारकांनी पुरोगामी महाराष्ट्राची मुहूर्तमेढ रोवली. याच पुरोगामी विचारांचा धागा पकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाची घटना लिहिली. आज आम्ही जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंत्या पुण्यतिथी साजर्‍या करतो, मात्र त्यांचे विचार मनात रुजविण्यात आम्ही अपयशी ठरलो आहोत. समाजात असत्याचा बोलबाला असून सत्य कथन हे केवळ शपथ घेण्यापुरते मर्यादीत राहिले आहे. थोर महापुरुषांच्या नावाने मंत्रीपदाची शपथ घ्यायची आणि प्रत्यक्षात मात्र धादांत खोटे बोलून, कटकारस्थाने करुन आणि मंत्रालयातील दालन अपशकुनी आहे म्हणून नाकारणारे, सुर्यग्रहण आहे म्हणून चक्क शपथविधी टाळणारे हे राजकारणी पुढारी पाखंडी नव्हे तर काय म्हणाल? राजकारणी पुढारीच नव्हे तर प्रशासनाची धुरा सांभाळणारे प्रशासकीय अधिकारी देखील या पाखंडी पुढार्‍याप्रमाणे बरबटलेले आहेत. धर्मनिरपेक्ष राज्यघटनेप्रमाणे प्रशासन चालविताना या अधिकार्‍यांना या गोष्टीचा विसर पडतो. अंधश्रद्धेचा पगडा आज सर्वच शासकीय कार्यालयात दिसून येतो. तर समाजाला दिशा देणारा शिक्षकही या अंधश्रद्धेच्या कचाट्यातून वाचू शकलेला नाही.

धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी कोणत्याही मुहूर्ताची गरज नसते. हिंदुत्ववादी म्हणविणार्‍या आणि संघाच्या विचारांने चालणार्या भाजपाच्या फडणविस सरकारने प्रतिगामी विचारांने कधीच निर्णय घेतल्याचे दिसत नाही. दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी जेंव्हा त्यांच्या कार्यालयात येतात तेव्हा ते कोणत्याही देवाच्या तस्बिरीच्या पाया पडत नाहीत, तर महात्मा गांधी आणि सरदार पटेल यांच्या प्रतिमेला वंदन करतात, मात्र त्याच मोदी सरकारचे संरक्षण मंत्री जेव्हा राफेल विमान घेताना त्याला काळा गंडा आणि चाकाखाली लिंबु ठेवतात तेंव्हा मात्र या नेत्यांच्या बुद्धीमत्तेची किव कराविशी वाटते. असाच प्रकार मी मुंबई महाड प्रवास करताना पाहीला. रामवाडी बसस्थानकावर महाडला येण्यासाठी फलाटावर लावलेल्या बोरीवली देवगड या नव्याकोर्या शयन बसमध्ये चढलो. चढताना मला बसच्या पुढील भागाच्या इंजिन खाली भली मोठी काळी बाहुली लटकवलेली दिसली. मला हा प्रकार पाहून त्या आगाराच्या अधिकार्याची कमाल वाटली. ही बाहुली अपघातापासुन या बसचा बचाव करणार होती की या बसचे उत्पन्न वाढविणार होती, आणि हे खर असेल तर एसटीच्या प्रत्येक बसला अशी काळी बाहुली लटवल्यास गाड्यांचे अपघातही होणार नाहीत आणि महामंडळही तोट्यातुन फायद्याकडे जाईल व कामगारांना आर्धा पगार देण्याचीही वेळ येणार नाही. मात्र अस काहीही होत नाही हे आम्हा सर्वांना माहीत आहे मात्र ते तस आमलात आणन्याचा प्रयत्न आम्ही करत नाही. आज समाजात या अंधश्रद्धेपोटी कीत्तेकांचे नरबळी गेले आहेत, शोषण होत आहे, आर्थिक  फसवणूक होत आहे, मुलींना गर्भातच मारले जात आहे, चेटकिण आणि डायन समजून कीत्तेक निरपराध महिलांना मारले जात आहे. अंधश्रद्धेमुळे समाजात होणारे हे गुन्हे रोखण्यासाठी सरकारने बुवाबाजी आणि अंधश्रद्धेविरोधी कायदा केला. मात्र शोकांतिका या गोष्टीची आहे की या कायद्याच्या निर्मिती साठी नरेंद्र दाभोळकर यांना शहीद व्हावे लागल. मात्र त्याच दाभोळकरांच्या खुनाच्या तपास करणार्‍या पोलीस अधिकार्याने मंत्र तंत्राचा वापर केला, आणि इथेच खर्‍या अर्थाने दाभोळकरांच्या विचारांचा खून झाला. आज तरुणांन मध्ये पुन्हा एकदा दाभोळकरांचे विचार जागृत करण्याची वेळ आली आहे. शाहु फुले आंबेडकरांचे पुरोगामी विचारांची सर्व शाळा, महाविद्यालय, आस्थापने, शासकीय कार्यालयातून सक्तिने अंमलबजावणी करण्याची वेळ आली आहे.

-महेश शिंदे, खबरबात

Check Also

रायगड जिल्ह्यात एकूण 69.04 टक्के मतदान

अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघांमध्ये 20 नोव्हेंबर रोजी झालेल्या मतदानात 69.04 टक्के …

Leave a Reply