अलिकडच्या काळात शेजारील राष्ट्रांचा उपद्रव वाढला आहे. पाकिस्तान पूर्वीपासूनच भारताच्या कुरापती काढत आला आहे. आता त्यात चीनची भर पडली आहे. महासत्ता बनू पाहणारा ‘ड्रॅगन’ भारताचा भूभाग गिळंकृत करण्याचा प्रयत्न करतोय. हे कमी म्हणून काय नेपाळही आगळीक करू लागला आहे, पण भारताला कमी लेखण्याची चूक कुणी करू नये!
भारत हा शांततापूर्ण देश म्हणून ओळखला जातो. भारताने संपूर्ण विश्वात शांतता नांदावी यासाठी नेहमीच प्राधान्य दिले आहे. खुद्द आपल्या देशात एवढ्या मोठ्या प्रमाणात विविध जाती-धर्मांचे लोक गुण्यागोविंदाने राहतात हे जगाच्या पाठीवरील एक अनोखे उदाहरण आहे. भारताने कधीही स्वत:हून कोणत्या देशाला त्रास दिला नाही वा कोणत्या राष्ट्रावर हल्लाही केलेला नाही, पण भारताच्या वाट्याला कुणी गेल्यास त्याला या देशाने जशास तसे उत्तर दिल्याचा इतिहास आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातात देशाची सूत्रे आल्यानंतर तर भारत एक मजबूत देश म्हणून जागतिक पातळीवर उदयास येताना दिसत आहे. त्याचीच शेजारील राष्ट्रांना धाकधूक दिसते. म्हणूनच पाकिस्तानच्या कुरापती वाढल्या आहेत. यासाठी दहशतवादी संघटना पोसल्या जात आहेत. त्यांना आश्रय दिला जात आहे. पाकपुरस्कृत दहशतवाद्यांनी जम्मू काश्मीरमधील उरीत 18 सप्टेंबर 2016 रोजी हल्ला केला होता. यामध्ये भारतीय लष्कराच्या 19 जवानांना वीरमरण आले. यानंतर दहाच दिवसांनी भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये जाऊन सर्जिकल स्ट्राइक केला. या कारवाईत जवानांनी दहशतवाद्यांचे तळ उदध्वस्त केले. यामध्ये अनेक दहशतवादी मारले गेले. यानंतर पाकिस्तानने 14 फेबु्रवारी 2019 रोजी पुन्हा एकदा आत्मघाती दहशतवाद्याला पुढे करून पुलवामामध्ये जवानांची बस बॉम्बने उडवून दिली. यात 40 जवान शहीद झाले. या घटनेचे जोरदार पडसाद उमटले आणि भारतीय लष्कराने थेट पाकिस्तानच्या हद्दीत घुसून जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळावर एअर स्ट्राइक केले. हवाई दलाच्या विमानांनी सुमारे एक हजार किलोचे बॉम्ब ‘जैश’च्या तळांवर फेकले. त्यात तळ, कंट्रोल रुम पूर्णपणे उदध्वस्त झाल्याचे समजते. यानंतरही दरवेळी भारत पाकड्यांना चोख उत्तर देत आला आहे. एकीकडे पाकिस्तानकडून कुरापती सुरू असताना दुसरीकडे चीनही विस्तारवादाच्या नादात भारताला डिवचत आहे. मध्यंतरी गलवान खोर्यात भारत-चीन सीमेवर उभय देशांतील जवानांमध्ये झटापट झाली. त्यात भारताचे 20 जवानांना वीरमरण आले, तर चीनचेही मोठे नुकसान झाले, मात्र धूर्त चीनने ते जाहीर करणे टाळले. कदाचित आपली नामुष्की जगजाहीर होण्यात त्यांना कमीपणा वाटत असेल. चीनचा पदर धरून नेपाळनेही भारताचा भूभाग आपला असल्याचे दाखवून नकाशा बदलण्याचा घाट घातला. त्यात त्यांच्या पदरी काही पडणार नसले तरी त्यांनाही पंख फुटले आहेत, पण कोणतेही पाऊल उचलण्यापूर्वी या शेजारील राष्ट्रांनी दहावेळा विचार करणे आवश्यक आहे. कारण भारतीय सेना पूर्वीच्या तुलनेत अधिक बळकट झालेली आहे. पंतप्रधान मोदी व सहकार्यांनी देशाचे सामरिक सामर्थ्य अधिक बळकट होण्यासाठी भर दिला आहे. अर्थसंकल्पात त्यासाठी मोठी तरतूद केली आहे. देशाची लष्करी ताकद वाढविण्यासाठी राफेल विमाने आली आहेत. आत्मनिर्भर भारत अंतर्गत विविध युद्धसामग्री देशातच तयार केली जात आहे. जवान कोणत्याही परिस्थितीशी मुकाबला करण्यास सक्षम असल्याचे लष्करप्रमुख एम. एम. नरवणे यांनी स्पष्ट केले आहे, तर चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत यांनीही इशारा दिला आहे. त्यामुळे गनीम शेजारील राष्ट्रांनो, सावधान!