अलिबाग ः प्रतिनिधी
इर्शाळवाडीतील दुर्घटनेनंतर रायगड जिल्ह्यातील सर्व दुर्गम वाड्या-वस्तींवर जाण्यासाठी रस्ते बांधण्यात येणार आहेत. केवळ आदिवासी वाड्याच नव्हे; तर धनगर वाड्या, दलित वस्ती असतील तरी तेथेही रस्ते बांधले जाणार असून त्यासाठी 11 कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे, अशी माहिती रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी रविवारी (दि. 30) येथे दिली. रायगड जिल्हा नियोजन समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत पालकमंत्री सामंत बोलत होते.
खालापूर तालुक्यातील दुर्घटनाग्रस्त इर्शाळवाडीचे पुनर्वसन सिडकोमार्फत करण्यात येणार आहे. सहा महिन्यांत हे पुनर्वसन केले जाईल. त्याचबरोबर जिल्ह्यातील 20 अतिधोकादायक गावांचे पुनर्वसन करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात येत आहे, असे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
सिनॉबेल कंपनीसाठी अलिबाग तालुक्यातील 350 एकर जागा हस्तांतरित करण्यात आली आहे. 20 हजार कोटींचा पेपर उद्योग येथे सुरू होणार आहे. याशिवाय माणगाव येथे लेदर क्लस्टर उभारणीला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. या ठिकाणी तैवानच्या धर्तीवर चर्मोद्योग उभे राहणार आहेत. बल्कड्रग्ज पार्कसाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे, अशी माहितीही पालकमंत्री यांनी दिली.
अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयाची इमारत वापरण्याजोगी आहे, असा अहवाल देण्यात आला आहे. त्याच्या दुरुस्तीसाठी पैसे देण्याचे आश्वासन राज्याच्या सार्वजनिक बांधकाममंत्र्यांनी दिले आहे. असे असले तरी सीओईपी या संस्थेमार्फत जिल्हा रुग्णालय इमारतीचे पुन्हा ऑडिट करण्यात येणार आहे. नवीन जिल्हा रुग्णालय कोणत्या जागेत बांधावे याचा निर्णय लवकरच घेतला जाईल. जिल्हा परिषदेची नवीन इमारत बांधण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने निधी मंजूर केला आहे, असे पालकमंत्री सामंत यांनी सांगितले.
रायगड जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या जलजीवन योजनेसाठी 12 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. या कामांची काय स्थिती याची चौकशी केली जाईल. तालुका स्तरावर बैठका घेऊन कामांची माहिती घेतली जाईल. त्यानंतर त्यावर कारवाई केली जाईल, असेही पालकमंत्री सामंत म्हणाले.
रायगड जिल्ह्यात महाड येथे एनडीआरएफचा तळ असावा यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचबरोबर ठाण्यातील टीआरडीएफप्रमाणे रायगड जिल्ह्यात पनवेल महापालिकेतही पथक स्थापन करण्यात येणार आहे, अशी माहिती पालकमंत्री सामंत यांनी दिली.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गासंदर्भात पुढील आठवड्यात केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे दिल्ली येथे बैठक लावण्यात आली आहे, अशी माहिती रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.
पत्रकार परिषदेला आमदार रविशेठ पाटील, महेंद्र दळवी, महेंद्र थोरवे, जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. बास्टेवाड उपस्थित होते.
Check Also
तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा
कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …