एकंदरीतच या सणासुदीच्या काळात व आगामी दिवाळीच्या खरेदीकरिता लोक मोठ्या संख्येने बाहेर पडतील व त्यामुळे गर्दी होऊन कोरोनाच्या फैलावाची शक्यता वाढेल, अशी भीती डॉक्टर व्यक्त करीत आहेत. त्यातच राज्य सरकारने शुक्रवारपासून हॉटेल्स, रेस्टॉरंट, बार आदींना रात्री साडेअकरा वाजेपर्यंत खुले राहण्याची मुभा दिल्याने लोकांना बाहेर पडण्यास प्रोत्साहन मिळेल, अशी भीतीही आहे.
देश पातळीवरील कोरोना परिस्थिती गेले जवळपास दहा दिवस सलगपणे दिलासादायक राहिली आहे. ऑक्टोबरच्या 4 तारखेपासून कोरोना मृतांची दैनंदिन संख्या एक हजाराच्या खाली राहिली असून प्रति दहा लाख लोकसंख्येमागील देशाचा कोरोना मृत्यूदर जगभरातील सर्वात कमी दरांपैकी एक आहे. शुक्रवारी तर देशपातळीवरील कोरोना मृत्यूदर अवघा 1.52 टक्के इतका होता. 22 मार्चपासूनचा हा आजवरचा सर्वात कमी असा मृत्यूदर आहे. देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील मृत्यूदर हा राष्ट्रीय पातळीवरील मृत्यूदरापेक्षाही कमी आहे. परंतु दुर्दैवाने महाराष्ट्रासह अन्य 13 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मात्र मृत्यूदर राष्ट्रीय पातळीवरील मृत्यूदरापेक्षा अधिक आहे. त्यातच उद्यापासून सुरू होणारा नवरात्री, दुर्गापूजा आणि दसरा हा सणासुदीचा मौसम सर्व संबंधितांची काळजी वाढवतो आहे. गणेशोत्सवाप्रमाणेच महाराष्ट्र सरकारने नवरात्रोत्सव, दुर्गापूजा आणि दसर्यासाठीही कोरोना परिस्थिती लक्षात घेऊन नवी नियमावली जाहीर केली आहे. देवीच्या मूर्तींच्या उंचीवर निर्बंध घालण्यात आले आहेतच, तसेच मंडपांमध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळण्याच्या दृष्टीनेही सूचना करण्यात आल्या आहेत. एरव्ही या काळात अतिशय उत्साहात खेळल्या जाणार्या गरबा, दांडिया आदी सांस्कृतिक उत्सवांना मनाई करण्यात आली आहे. तरीही काही उत्साही नागरिक ऑनलाइन दांडिया करण्याच्या प्रयत्नात आहेत. आपापल्या घरात वा गच्चीवर गरबा, दांडिया करून समाज माध्यमांवर त्याचे लाइव्ह प्रक्षेपण करण्याचा काही जणांचा मानस आहे. गर्दी पूर्णत: टाळून, निव्वळ कुटुंबाच्या पातळीवर घरांमध्ये असे आयोजन करण्यास हरकत नसावी. पण त्याकरिता कपडे आणि दागिन्यांची खरेदी करण्यास मंडळी मोठ्या संख्येने बाहेर पडल्यास मात्र बाजारांमध्ये गर्दी होऊ शकेल. सणासुदीच्या माहौलात बेफिकिरी वाढण्याची शक्यता आहे. त्यातच अनेक लोक मास्क वापरत नाहीत किंवा बहुतेक वेळा तो ओढून हनुवटीखाली ठेवतात. अनेकांना मास्कच्या योग्य वापराची माहिती दिसत नाही. या सार्यामुळेच डॉक्टरमंडळी संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त करीत आहेत. पश्चिम बंगालमध्ये तर दुर्गापूजांचे आयोजन थांबवण्यासाठी तेथील उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्यात आले आहेत, तर सरकारी पातळीवरून कलकत्त्यातील डॉक्टरांना शहराबाहेर न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. म्हणजे एकीकडे देशपातळीवर परिस्थिती सुधारल्याचा दिलासा आहे, तर शनिवारपासून सुरू होणार्या धामधुमीत कोरोनाचे थैमान वाढण्याची भीती आहे. शक्य तिथे देवीच्या ऑनलाइन दर्शनाची व्यवस्था करून व काटेकोरपणे सोशल डिस्टन्सिंग पाळून या काळात वाढीव खबरदारी घ्यावी लागेल. दरम्यान, मास्क न घातल्याबद्दल पहिल्या गुन्ह्याची नोंद गुरुवारी मुंबईतील गोवंडी पोलीस ठाण्यामध्ये झाली. दंड भरण्यास नकार दिल्याने व पालिकेच्या कर्मचार्यांशी उद्धट वर्तन केल्याने तरुणाविरोधात मास्क न घातल्याप्रकरणी एफआयआर नोंदवण्यात आला. येत्या काळातील वाढत्या कोरोना थैमानाची भीती लक्षात घेता अशीच कठोर उपाययोजना करणे भाग पडणार आहे.