कोरोनासंदर्भात विविध विषयांवर वेधले लक्ष
मुंबई : प्रतिनिधी
राज्यात कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या सरकारसाठी चिंतेचा विषय बनली आहे. पुण्यात एका दिवसात तीन रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यातील या परिस्थितीवर माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. या पत्रातून त्यांनी अनेक मागण्या राज्य सरकारकडे केल्या आहेत.
या पत्रात देवेंद्र फडणवीस म्हणतात की, राज्यातील नागरिकांना रेशनचे धान्य मिळत नसल्याच्या तक्रारी वारंवार प्राप्त होत आहेत. केंद्र सरकारने तीन महिन्यांचे धान्य रेशनमार्फत देण्याचे आदेश दिले असताना त्यापैकी 90 टक्के कोटा राज्याला प्राप्त झाला तरीही वितरणाची व्यवस्था खोळंबली आहे. यात तुम्ही स्वत: लक्ष घालावे.
याचसोबत मुंबईतील आरोग्य व्यवस्था व एकूणच लॉकडाऊन काळातील परिस्थितीचे चिंतन होणे गरजेचे आहे. आरोग्य कर्मचारी, डॉक्टर्स यांच्या सुरक्षा उपाययोजनांची कमतरता मोठ्या प्रमाणात पुढे येत आहे. जर योग्य उपाययोजना तातडीने केल्या नाहीत, तर आरोग्य कर्मचारी व डॉक्टर्सना कोरोनाची लागण होण्याची दाट शक्यता आहे. याबाबत तातडीने निर्णय घेणे आवश्यक आहे, याकडेही फडणवीस यांनी लक्ष वेधले.