Breaking News

विदर्भाचा दबदबा कायम सलग दुसर्यांदा इराणी करंडक जिंकला

मुंबई : प्रतिनिधी

गणेश सतीश आणि आणि अथर्व तायडेच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर विदर्भाने इराणी करंडकाच्या अखेरच्या दिवशी शेष भारतावर पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर विजय मिळवला आहे. शेष भारताने दिलेले 280 धावांचे आव्हान विदर्भाच्या फलंदाजांनी संयमीपणे फलंदाजी करत पूर्ण करीत आणले होते, मात्र दुसर्‍या डावात गणेश सतीश बाद झाल्यानंतर दोन्ही कर्णधारांनी एकमताने सामना थांबवण्याचा निर्णय घेतला. यानंतर विदर्भाने पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर सामन्यात विजय मिळवला. विदर्भाचे हे इराणी करंडकाचे सलग दुसरे विजेतेपद ठरले आहे. काही दिवसांपूर्वी विदर्भाने रणजी करंडकाच्या अंतिम फेरीत सौराष्ट्रावर मात करीत सलग दुसर्‍यांना रणजी करंडक पटकावण्याचा बहुमान मिळवला होता.

पहिल्या डावात आदित्य सरवटे आणि अक्षय वाखरेच्या गोलंदाजीच्या जोरावर शेष भारताचा संघ 330 धावांपर्यंत मजल मारू शकला. पहिल्या डावात मयांक अग्रवालने 95; तर हनुमा विहारीने 114 धावांची खेळी करीत आपले योगदान बजावले. याला प्रत्युत्तर देताना विदर्भाने पहिल्या डावात 425 धावांपर्यंत मजल मारत पहिल्या डावात 95 धावांची बहुमुल्य आघाडी घेतली. विदर्भाकडून अक्षय कर्णेवारने 102 धावांची शतकी खेळी केली. त्याला अक्षय वाडकर, संजय रामास्वामी यांनी अर्धशतकी खेळी करुन चांगली साथ दिली.

दुसर्‍या डावात शेष भारताची सुरुवात डळमळती झाली. मयांक अग्रवाल आणि अनमोलप्रीत सिंह हे फलंदाज स्वस्तात माघारी परतले, मात्र यानंतर कर्णधार अजिंक्य रहाणे आणि हनुमा विहारी यांनी तिसर्‍या विकेटसाठी द्विशतकी भागीदारी रचत संघाचा डाव सावरला. हनुमा विहारीने सलग दुसर्‍या डावात शतकी खेळी करीत आपल्या नावावर विक्रमाची नोंद केली. तो 180 धावांवर नाबाद राहिला. त्याला अजिंक्य रहाणेने 87; तर श्रेयस अय्यरने नाबाद 61 धावा काढत चांगली साथ दिली. शेष भारताने आपला दुसरा डाव 374/3 ला घोषित करत विदर्भाला 280 धावांचे आव्हान दिले.

विजयासाठी मैदानात उतरलेल्या यजमान विदर्भाची सुरुवातही डळमळती झाली. कर्णधार फैज फजल भोपळाही न फोडता माघारी परतला, पण यानंतर संजय रामास्वामी, अथर्व तायडे आणि गणेश सतीश यांनी छोट्या-छोट्या भागीदारी रचत विदर्भाला विजयाच्या नजीक नेले, मात्र विजयासाठी 11 धावा हव्या असताना दोन्ही कर्णधारांनी सामना अनर्णित राखण्यावर एकमत केले. यानंतर विदर्भाने पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर सामन्यात विजय मिळवला.

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply