Breaking News

अहो आश्चर्यम्! नेरळमध्ये रस्त्याची चोरी

कर्जत : बातमीदार

कर्जत तालुक्यातील सगळ्यात मोठी आर्थिक उलाढाल असलेल्या नेरळ ग्रामपंचायतीमध्ये चक्रावून सोडणारे एक प्रकरण समोर आले आहे. या ग्रामपंचायत हद्दीत ग्रामनिधीमधून केलेला एक रस्ताच चोरीला गेला आहे.

एप्रिल 2019मध्ये नेरळ  हेटकरआळी भागात एका काँक्रीट रस्त्याचे काम करून बिल काढण्यात आले होते, मात्र आता तो रस्ताच त्या ठिकाणी नसल्याने ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीकडे तक्रार केली आहे तसेच संबंधित रस्त्याचा शोध घेण्याची विनंतीही केली आहे. दरम्यान रस्ता न करताच बिले काढल्याचे धक्कादायक बाब समोर आली असल्याने तत्कालीन सरपंच व सदस्यांवर कारवाई होणार का, असा प्रश्नदेखील उपस्थित झाला आहे.

नेरळ ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या हेटकरआळी भागात अजित सावंत यांचे घर ते सुगवेकर वाडा येथपर्यंत सिमेंट काँक्रीटचा रस्ता व गटार यांचे काम नव्याने करण्याचे होणार होते. यासाठी ग्रामनिधीमधून दोन लाख 90 हजार रुपयांची तरतूद करण्यात आली होती. हा रस्ता उत्तम झाला, पण तो केवळ कागदावरच. कारण प्रत्यक्षात हा रस्ता झालाच नसल्याचा आरोप येथील ग्रामस्थांनी केला आहे, तर नेरळ ग्रामपंचायतीमधून या रस्त्यासाठी 14 मे 2019 रोजी दोन लाख 75 हजार एवढे बिल ठेकेदाराला अदा करण्यात आले आहे, पण या रस्त्याच्या कामासाठी शासकीय नियम अटींना तिलांजली देत काम करण्यात आल्याचे समोर आले आहे. कोणतेही कार्यरंभ आदेश व ठेकेदाराची नियुक्ती न करताच कामासाठी घिसाडघाई करण्यात आल्याचे समजते. त्यामुळे रस्ता न करताच बिल काढले असल्याचे चित्र समोर आहे, तर रस्ता झाला मग तो गेला कुठे, असा प्रश उपस्थित करीत स्थानिक ग्रामस्थ देवा गवळी यांनी रस्ता चोरीला गेल्याची तक्रार ग्रामपंचायतीकडे केली आहे.

दरम्यान, या कामाचे मूल्यांकन करणार्‍या पंचायत समितीच्या कनिष्ठ अभियंता असलेल्या मनीषा शीड यांच्याशी अधिक माहितीसाठी संपर्क केला असता, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही, तर ज्यांचे या प्रकरणात नाव आले आहे असे माजी उपसरपंच केतन पोतदार यांचादेखील संपर्क होऊ शकला नाही.

याबाबत नेरळ ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी एम. डी. गोसावी यांनी या रस्त्याचे प्रकरण तत्कालीन सरपंच व सदस्य तसेच ग्रामसेवक यांच्या कार्यकाळातील आहे. या प्रकरणाची माहिती माझ्याकडे नाही.तेव्हा याबाबत चौकशी करून योग्य ती माहिती वरिष्ठ कार्यालयास दिली जाईल, असे सांगितले.

दरम्यान, स्थानिक रहिवासी देवानंद गवळी यांनी गेले अनेक वर्षे आम्ही इथे राहत आहोत, मात्र मागील साधारण 15 वर्षांपासून हा रस्ता आहे त्याच स्थितीत आहे. यावर कोणतेही काम करण्यात आलेले नाही. या ठिकाणी तीन लाखांचा रस्ता झाल्याचे आम्हाला समजले आहे. मग रस्ता गेला कुठे? हा रस्ता चोरीला गेला का, याबाबत आम्ही ग्रामपंचायतीकडे तक्रारी अर्ज देऊन विचारणा केली आहे.

या कामाचे बिल माझ्या नावावर काढण्यात आले. मला 30 हजार रुपये देऊन उर्वरित पैसे माजी उपसरपंच केतन पोतदार यांनी माझ्याकडून घेतले, पण कसले पैसे आहेत हे मला माहीत नव्हते. एकंदर या कामाशी माझा काहीही संबंध नाही.

-सलीम उस्मान सहा, ठेकेदार

Check Also

पनवेलमध्ये एसआयआरसंदर्भात बैठक

पनवेल : रामप्रहर वृत्तमतदारयादी विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) अभियानासंदर्भात भाजप पनवेल विधानसभा मतदारसंघाचे बीएलए व …

Leave a Reply